मयूर गलांडे -
मुंबई - क्रिकेट चाहत्यांच्या एका पिढीवर आपल्या गोलंदाजींनं गारुड मिरवणाऱ्या अनिल कुंबळेचं आज 50 वर्षात पदार्पण होतंय. शांत, संयमी आणि दिलदार मनाचा अनिल कुंबळे सध्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा मेंटर म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणूनही त्याने काम पाहिलं. मात्र, विराट वादामुळे अखेर मनाचा मोठेपणा दाखवत कुंबळेंनी स्वत:हून राजीना दिला. कुंबळेचा राजीनाम हा त्याच्या करिअरचा ग्राफ कमी करणार असला, तरी त्याच्यातील विनम्र अन् लिजंड खेळाडूची उंची वाढवणार आहे.
तसं पाहिल तर गोलंदाजांना चाहत्यांचं प्रेम कमीच मिळतं. ज्याप्रमाणे आपल्याला गल्लीत क्रिकेट खेळताना बॅटींग हवी असती, अगदी तसचं मॅच पाहताना नेहमीच चौक्के आणि छक्के मारणारा बॅट्समनचा आवडतो. त्यामुळे सुनिल गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, अजय जडेजा, रॉबिन सिंग, मोहम्मद कैफ, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंग धोनी आणि आता विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दीक पांड्या यांचा नंबर लागला आहे. सहजजरी कोणाला प्रश्न केला, तुझा आवडता क्रिकेटर कोण ? तर उत्तरादाखल तुम्हाला 95 टक्के फलंदाजांचेच नाव ऐकायला मिळतील. गोलंदाजांना पसंती तुरळकच मिळते. केवळ एखाद्या मॅचमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात त्यांची वाहवा होते. मात्र, गोलंदाजांतही संघ बांधणीची ताकद असते.
कोहलीच्या खेळाचे सर्वत्र कौतूक होत असतानाच त्याच्या ‘विराट वागण्यामुळे’ अनिल कुंबळेंनी राजीनामा दिला. कुंबळे आणि विराट यांच्यात पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वीही भांडण झाल्याची चर्चा होती. दोघांतील संषर्घ टोकाला पोहोचला होता. त्यामुळे मन मोठे करून अनिल कुंबळेने स्वत:हून राजीनामा देत आपला स्वाभीमान जपला. अनिल कुंबळे हा तोच खेळाडू आहे, ज्याने भारतासाठी 18 वर्षे क्रिकेट खेळले. कुंबळे तोच खेळाडू आहे, ज्याने भारताकडून सर्वाधिक (619-337) विकेट घेण्याचा विक्रम केला. कुंबळे तोच आहे, ज्याने जबड्याला लागलेलं असतानाही तोंडाला पट्टी बांधून मैदानात खेळ केला. कुंबळे तोच खेळाडू आहे, ज्याने सिद्धू, अजहर, जवागल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, सचिन, द्रविड, लक्ष्मण, गांगुली, सेहवाग, धोनींसारख्या दिग्गजांच्या साथीने खेळ केला आहे.
कुंबळे तोच आहे, ज्याने 1999 मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध इतिहास रचला. कुंबळेने 9 विकेट मिळवल्यानंतर प्रत्येक भारतीय दहावी विकेट त्यानेच घ्यावी म्हणून प्रार्थना करत होता. देश प्रथमच गोलंदाजाच्या विक्रमाची वाट पाहात होता, कारण समोर पाकिस्तान होता. पाकिस्तानविरुद्ध आणखी एक इतिहास भारत रचणार होता. आणि तेवढ्यात कुंबळेने फलंदीजी करत असलेल्या अक्रमला लेग ब्रेक चेंडू फेकला. चेंडू डॉट करण्याच्या नादात अक्रमच्या बॅटला कट लागून लेग पाईंटवर असलेल्या लक्ष्मणने विश्वविक्रम रचणारा तो झेल टिपला. फिरोजशाह कोटला मैदानासह देशभर जल्लोष उसळला, भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. इंग्लंडच्या जीम लेकरनंतर 10 विकेट घेणारा कुंबळे जगातील दुसरा तर भारताचा पहिला खेळाडू ठरला होता. आता प्रश्न हा आहे की, क्रिकेटचा एवढा गाढा अनुभव आणि संयमी चेहरा असलेला कुंबळे मनाने किती विराट होता, हेही आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत त्यांने दाखवून दिलं.