टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्मा याचा आज 33 वा वाढदिवस. नागपूरच्या बनसोड येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील सुतारकाम करायचे. त्याच्या काकांनी त्याला मुंबईत आणले आणि तेथून त्याच्या क्रिकेटचा प्रवास सुरु झाला. 1999मध्ये काकांनी दिलेल्या पैश्यांमुळे तो क्रिकेट कॅम्पला गेला. हॅरिस शिल्ड आणि गाईल्स शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत पदार्पणातच त्यानं सलामीवीर म्हणून शतक झळकावलं होतं. त्यानंतर रोहितच्या कामगिरीचा आलेख चढाच राहीला... आज संपूर्ण जग रोहितला 'हिटमॅन' म्हणून ओळखतं. पण, तुम्हाला हे माहित्येय का रोहितला फलंदाज नाही तर गोलंदाज बनायचं होतं?
रोहित शर्माचा फिल्मी अंदाज; गुडघ्यावर बसून रितिकाला केलेलं प्रपोज
रोहितनं मुंबईत क्रिकेटचे धडे गिरवले. ट्रायलसाठी तो एक दिवस स्टेडियममध्ये पोहोचला, तेव्हा नेट्समध्ये फलंदाजाच्या ट्रायल्ससाठी मोठी रांग त्यानं पाहीली. तेव्हा त्यानं गोलंदाज बनण्याचा निर्णय घेतला आणि ऑफ स्पिन गोलंदाजीही केली. तेव्हा त्याची निवडही झाली. 2005मध्ये श्रीलंकेचा ज्युनियर संघ भारत दौऱ्यावर आला होता. 50 षटकांच्या सामन्यात रोहितच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आणि गोलंदाज बनण्याचं त्याचं स्वप्न अपूर्ण राहिले. पण, प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहितमधील टॅलेंट ओळखले आणि त्याला फलंदाज बनण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यानं फलंदाजीवर लक्ष केंद्रीत केलं आणि आज तो जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.
रोहित शर्माकडे आज 150 कोटींची मालमत्ता आहे, परंतु जेव्हा त्यानं क्रिकेटला सुरुवात केली तेव्हा त्याच्याकडे शाळेची फी भरण्यासाठीचेही पैसे नव्हते. रोहित सुरुवातीला डोंबिवलीच्या वेलानकन्नी हायस्कूलमध्ये शिकायचा, परंतु क्रिकेटसाठी त्यानं बोरीवली गाठलं. येथील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याला अॅडमिशन घेण्याचा सल्ला दिला गेला. पण, त्याच्या कुटुंबीयांकडे फीसाठीचे पैसे नव्हते. रोहितचं टॅलेंट पाहून शाळेनं त्याची फी माफ केली.