भारतीयांनी ज्या खेळाडूला भरभरून प्रेम दिलं, ज्याला देवासमान मानलं... ते नाव म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सर्वांचा लाडका सचिन बुधवारी त्याचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. टीम इंडियाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव असे मानले जाते. क्रिकेटच्या इतिहासात शतकांचे शतक झळकावणारा खेळाडू म्हणून इतिहासाच्या पानावर सचिनची नोंद आहे. सचिनच्या वाढदिवशी त्याची लेक सारा तेंडुलकरने काही खास फोटो शेअर केले आहेत.
'वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा', अशा आशयाचे कॅप्शन सारा तेंडुलकरने दिले आहे. सारा नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते. आज तिने बाबांच्या वाढदिवशी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
दरम्यान, सचिनचा शंभर शतकांचा विक्रम अजून पर्यंत कोणालाही तोडता आलेला नाही. सचिनने ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शंभर शतके ठोकली. सचिन नंतर सध्या विराट कोहली ८० शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्याला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी आणखी २१ शतके करावी लागणार आहेत. सचिनने आपल्या कारकिर्दीत ५१ कसोटी आणि ४९ वन डे शतके ठोकली.
गोलंदाजीतही कमाल
आपल्या फलंदाजीने भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणारा सचिन गोलंदाजीतही कमी नव्हता. एकाच मैदानावर दोनदा पाच बळी घेणारा सचिन हा पहिला भारतीय गोलंदाज आहे. त्याने १९९८ मध्ये कोची येथे ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाच बळी घेण्याची किमया साधली होती. सचिन तेंडुलकर हा भारतासाठी वन डे सामन्यात बळी घेणारा सर्वात तरूण खेळाडू आहे. त्याने १७ वर्ष २२४ दिवसांचा असताना वन डे सामन्यात बळी पटकावला होता. सचिनने कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-२० च्या एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील ४१६ डावांत गोलंदाजी केली आहे. यात त्याला एकूण २०१ बळी घेता आले.