Happy Birthday Sachin Tendulkar, Sara Tendulkar: संपूर्ण भारतासाठी क्रिकेटचा देव, मास्टरब्लास्टर, जागतिक क्रिकेटमधला महान फलंदाज आणि दैवत अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा सचिन रमेश तेंडुलकर आपल्या मुलांसाठी मात्र एक वडिल म्हणून सर्वाधिक जवळचा आहे. सचिनची मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन दोघेही कायम सचिनच्या जवळ असतात. त्यातही बाप आणि मुलीचं नातं हे काही औरच असतं हे सारेच मान्य करतात. त्यामुळे आपल्या सर्वांचा लाडका असलेल्या सचिनला आज ५० वर्षांचा झाल्याबद्दल त्याच्या लाडक्या लेकीने खास गिफ्ट दिलं आहे. तिने एक स्पेशल फोटो पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
साराने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलं फोटो-कोलाज! वडिलांना दिल्या शुभेच्छा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती घेतली. या गोष्टीलाही आता दहा वर्ष होत आली. पण तरीही त्याने त्याची प्रतिमा आणि चाहतावर्ग अद्यापही तसाच राखण्यात यश मिळवले आहे. निवृत्तीनंतर त्याचा चाहतावर्ग कमी झालेला नाहीच, उलट सचिनच्या नवनव्या गोष्टींमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये भरच पडताना दिसते. क्रिकेटमध्ये ४०व्या वर्षी निवृत्त होणाऱ्या सचिनने २४ वर्षे क्रिकेट खेळले आणि समृद्ध अशी कारकीर्द घडवली. सचिनचे रेकॉर्ड पाहिले की प्रत्येक भारतीय सचिनला साष्टांग दंडवत घालूनच त्याचे आभार मानू शकतो. मात्र आपल्या घरच्यांसाठी तो अजूनही हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे त्याची लेक सारा हिने एक अतिशय सुंदर फोटो कोलाज शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिनचा एकेकाळचा सहकारी आणि माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानेही सचिनला आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. विरू मैदानावर आपल्या तडाखेबाज बॅटिंगसाठी ओळखला जायचा. निवृत्तीनंतर सोशल मीडिया आणि कॉमेंटरी बॉक्समध्ये तो त्याच्या विनोदबुद्धीसाठी चांगलाच चर्चेत असतो. एखाद्या चर्चेत असलेल्या विषयावर तो अतिशय चपखलपणे आणि तितकेच विनोदी अंगाने भाष्य करतो. त्याच्या सोशल मीडियावर अनेकदा लोक त्याची स्तुती करताना दिसतात. आज विरूचे दैवत असलेल्या सचिनचा ५०वा वाढदिवस असल्याने सेहवागने फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. विरू ने शीर्षासन करून सचिनला शुभेच्छा दिल्यात. तो म्हणाला- "सचिन पाजी, मैदानात तुम्ही जे बोललात त्याच्या उलटंच केलं आहे. त्यामुळे तुमच्या ५०व्या वाढदिवशी तुम्हाला उलटं होऊन शीर्षासनात शुभेच्छा दिल्याच पाहिजेत. मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सदिच्छा व्यक्त करतो की तुमचं जीवन सदैव सरळ चालत राहो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो."