मुंबई - टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 37 वा बर्थ डे आहे. मात्र, धोनीच्या कर्णधारपदी विराजमान होण्याची कथाही अतिशय रंजक आहे. झारखंडने देशाला दिलेला उत्तम कर्णधार म्हणजे महेंद्रसिंह धोनी असे माजी कृषीमंत्री आणि बीसीसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात म्हटले होते. धोनीकडे टीम इंडियाचे नेतृत्व अचानकपणे देण्यात आले. मात्र, सचिनमुळेच धोनी कर्णधार झाल्याचेही पवार यांनी सांगितले.
धोनीचे जीवन हे अगदी वळणाच्या पाण्यासारखे आहे. त्याच्या जीवनात अनेक रंजक घडामोडी घडल्या आहेत. त्याचप्रमाणे धोनीकडे टीम इंडियाचे नेतृत्व सोपविण्याची गोष्टही मजेशीर आहे. शरद पवार हे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. त्यावेळी राहुल द्रविडच्या नेतृत्वात टीम इंडिया लंडन दौऱ्यावर क्रिकेट खेळत होती. मात्र, कर्णधारपदाची जबाबदारी असल्याने द्रविड दडपणाखाली खेळत होता. संघाच्या कामगिरीवर त्याचा वाईट परिणाम होत होता. त्यामुळे शरद पवार लंडनमध्ये आल्याचे समजताच, राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरने शरद पवारांना भेटण्यासाठी थेट हॉटेल गाठले. तेथे कर्णधारपद सोडायची इच्छा द्रविडने शरद पवार यांच्याकडे बोलून दाखवली.
सचिननेही राहुल द्रविडच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. मात्र, 2007 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची जबाबदारी कोणाकडे द्यायची हा प्रश्न पवारांना पडला होता. त्यामुळे पवार यांनी सचिनला कर्णधार स्विकारण्याचे सूचवले. मात्र, सचिनने महेंद्रसिंह धोनीचे नाव शरद पवारांना सूचवले. जास्त परिचीत नसेलेले नाव ऐकल्यामुळे शरद पवारांच्या मनात शंका दाटून आली. पण, सचिनच्या विनंतीला मान देऊन पवार यांनी धोनीला एक संधी द्यायचे ठरवले. त्यानंतर, याच एका संधीला सर्वस्व मानून धोनीने क्रिकेट विश्वात टीम इंडिया आणि महेंद्रसिंह धोनीचे नाव अजरामर केले. शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकात त्यांनी हा किस्सा लिहिला आहे.