नवी दिल्ली : सौरव गांगुली हे एक असं नाव आहे की ज्यानं भारतीय क्रिकेटपटूंना परदेशात जिंकणे शिकवले. विवादात अडकलेल्या भारतीय संघाचे नशीब त्यानं बदललं आणि भारताला वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. 2003ची नेटवेस्ट सीरिज जिंकून गांगुलीनं जगाला भारतीय संघाची ताकद दाखवली होती. आज त्याच गांगुलीचा वाढदिवस आहे. भारतीय संघाला यशोशिखरावर पोहोचवणाऱ्या गांगुलीच्या एका चुकीनं त्याची कारकीर्द संपुष्टात आणली, शिवाय संघाला बॅकफुटवरही टाकले. गांगुलीची ती चूक कोणती?
गांगुलीची नजर पारखी होती. याच कौशल्यामुळे त्यानं अनेक खेळाडूंना संधी दिली. पण 2004मध्ये एका व्यक्तीला ओळखण्यात त्याच्या नजरेने चूक केली. 2004मध्ये जॉन राईट यांच्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी ग्रेग चॅपेल यांची निवड करण्यात आली. गांगुलीनेच चॅपेल यांच्यासाठी निवड समितीवर दबाव आणला होता. गांगुलीने त्याच्या आत्मचरित्रात या बद्दल लिहिले आहे की,''आव्हानात्मक परिस्थितीत भारतीय संघाला अव्वल स्थानावर नेण्याची क्षमता चॅपेल यांच्यात आहे, असे मला वाटले होते. मी माझा निर्णय जगमोहन दालमिया यांनाही सांगितला होता. सुनील गावस्करसह अनेकांनी मला हा निर्णय न घेण्यास सांगितले होते. मला पुनर्विचार करण्यासही सांगितले होते.''
पण, गांगुलीनं कोणाचाही सल्ला मान्य केला नाही आणि चॅपेल यांना प्रशिक्षक करण्याचा निर्णय घेतला. चॅपेलच्या आगमनानंतर भारतीय संघात फुट पडली आणि गांगुलीचे कर्णधारपदही गेले. 2007च्या वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशकडून पराभूत होत भारतीय संघ स्पर्धेबाहेर गेला. याबद्दलही गांगुलीनं लिहिले की,''कर्णधारपद हिसकावून घेणं, ही अनपेक्षित गोष्ट होती. माझ्यासोबत जे झाले ते कोणासोबतही घडू नये.''
चॅपेल यांना प्रशिक्षक बनवणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे गांगुलीनं सांगितले होते. तसे झाले नसते तर गांगुली आणखी काही काळ खेळला असता.