मुंबई : भारतीय संघ परदेशातही दणक्यात विजय मिळवू शकतो, असा खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या सौरव गांगुलीचा आज वाढदिवस. 8 जुलै 1972मध्ये कोलकाता येथे गांगुलीचा जन्म झाला. आपल्या 12 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत गांगुलीनं 5 वर्ष कर्णधारपदाची धुरा सांभाळली. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं जिंकलेली नेटवेस्ट सीरिज आजची सर्वांच्या स्मरणार्थ आहे. 2003च्या वर्ल्ड कप स्पर्धेत गांगुलीच्या नेतृत्वाखाळी भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
20 जून 1996 साली लॉर्ड्स मैदानावरून गांगुलीनं आंतरराष्ट्रीय कसोटीतून भारतीय संघात पदार्पण केले होते आणि 6 नोव्हेंबर 2008 मध्ये त्याने अखेरचा सामना खेळला होता. भारताकडून 311 वन डे सामन्यात त्यानं 40.73 च्या सरासरीनं 11, 363 धावा केल्या आहेत. त्यात 22 शतकांसह 72 अर्धशतकांचाही समावेश आहे. 113 कसोटींत त्याच्या नावावर 16 शतकं व 35 अर्धशतकांसह 7212 धावा आहेत. आयपीएलमध्ये त्याने 59 सामन्यांत 7 अर्धशतकांसह 1349 धावा केल्या आहेत.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं गांगुलीला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं ट्विट केलं की,''56 इंचाची छाती असलेल्या दादाला शुभेच्छा.. सातव्या महिन्याची आठवी तारीख म्हणजेच 8*7=56 आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील सरासरीही 56.''