Rahul Dravid Welcomes New Year with Virat & Team India: भारतीय संघाने सेंच्युरियनच्या मैदानावर इतिहास घडवला. त्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला हरवणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला. या दमदार विजयानंतर भारतीय संघाने सरत्या वर्षाला निरोप देतानाच नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं. महत्त्वाची बाब म्हणजे, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि इतर कोचिंग स्टाफदेखील विराट आणि कंपनीसोबत नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी दाखल झाला. सर्वांनी एकत्रितपणे मिळून मिसळून नववर्षाचे जंगी स्वागत केले.
भारतीय संघाचा अनुभवी आणि सध्याच्या खेळाडूंपैकी ज्येष्ठ खेळाडू असलेल्या रविचंद्रन अश्विनने या दणकेबाज सेलिब्रेशनचा फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केला. संपूर्ण टीम एकत्र सेलिब्रेट करताना पाहून फॅन्सदेखील भरपूर खुश झाल्याचे दिसले. अश्विनने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर काही वेळातच फोटो व्हायरल झाला. फोटोत कर्णधार विराट कोहली, माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे, नवा उपकर्णधार लोकेश राहुल साऱ्यांच्याच चेहऱ्यावर छान हास्य होतं. इतकंच नव्हे तर नेहमी गंभीर भावमुद्रेत असणाऱ्या राहुल द्रविडच्या चेहऱ्यावरही या फोटो हसू खुलल्याचं दिसलं.
पाहा अश्विनने शेअर केलेला फोटो-
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत नववर्षाचं स्वागत केलं. आफ्रिकेविरूद्ध भारताने कसोटी मालिकेची सुरूवात विजयाने केली. भारताला या मालिकेत आणखी दोन कसोटी खेळायच्या आहेत. भारताचा संघ आतापर्यंत आफ्रिकेत कधीही कसोटी मालिका जिंकलेला नाही. त्यामुळे यंदा ही मालिका जिंकून दुष्काळ संपवण्याचा विचार टीम इंडियाच्या मनात नक्कीच आहे.
कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आफ्रिकेविरूद्ध तीन वन डे सामन्यांचे मालिका खेळणार आहे. विराट कोहलीची वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी केल्यानंतर या मालिकेसाठी रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यात येणार होते. पण रोहित दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. अशा परिस्थितीत केएल राहुलकडे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे.