नवी दिल्ली : रविचंद्रन अश्विनचा हेवा करीत नसून तामिळनाडूचा हा गोलंदाज ‘एक दिग्गज क्रिकेटपटू’ होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असे अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंगने म्हटले आहे.
अश्विनने भारतीय संघात हरभजनचे स्थान घेतले आणि आता तो आॅस्ट्रेलियाच्या नॅथन लियोनसह जगातील सर्वोत्तम आॅफ स्पिनर आहे. हरभजनने अद्याप निवृत्ती जाहीर केलेली नाही, पण त्याने भारतातर्फे अखेरचा सामना २०१६ मध्ये खेळला होता. या ३९ वर्षीय फिरकीपटूने १०३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात अखेरचा सामना २०१५ मध्ये खेळला होता. दुसऱ्या बाजूचा विचार करता २०११ मध्ये पदार्पणानंतर अश्विनने आतापर्यंत ७१ कसोटी सामने खेळले आहेत.
हरभजनने अश्विनसोबत इन्स्टाग्रामवर बातचीत करताना म्हटले, ‘अनेकजण विचार करतात की मी हेवा करतो. त्यांना जो विचार करायचा आहे तो करू दे. मी तुला हे सांगू इच्छितो की सध्या जे आॅफ स्पिनर खेळत आहे त्यात तू सर्वश्रेष्ठ आहेस.’ हरभजन पुढे म्हणाला, ‘नक्कीच मला नॅथन लियोन आवडतो. माझी नेहमीच त्याला अव्वल पसंती राहील कारण तो आॅस्ट्रेलियात खेळतो. तेथील परिस्थिती फिरकीपटूला अनुकूल नसते. तू (अश्विन) त्या खेळाडूंपैकी आहेत जे दिग्गज होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. मी तुला शुभेच्छा देतो. तू खोºयाने बळी घे.’ ही चर्चा भारताच्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या २००१ च्या मायदेशातील मालिकेतील शानदार पुनरागमनावर केंद्रित होती. भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर होता, पण त्यानंतर पुढील दोन सामने जिंकत भारताने शानदार पुनरागमन केले.