नवी दिल्ली-
भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकापेक्षा एक क्रिकेटपटूंची निवड करत त्याचा आजवरचा सर्वोत्तम क्रिकेट संघ निवडला आहे. हरभजननं त्याच्या संघात त्याच्यावेळेच्या महान क्रिकेटपटूंना स्थान दिलं आहे. ऑल टाइम ग्रेट क्रिकेटपटूंच्या अंतिम ११ जणांच्या संघात हरभजननं दोन भारतीय महान खेळाडूंना स्थान दिलं आहे.
हरभजननं ज्या दोन भारतीय क्रिकेटपटूंना आपल्या संघात स्थान दिलं आहे त्यात सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचं नाव आहे. हरभजन सिंग यानं त्याचा जवळचा मित्र आणि धकाडेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला आपल्या संघात सलामीवीर म्हणून स्थान दिलं आहे. तर त्याच्यासोबत इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कुक याचा समावेश केला आहे. तर वेस्ट इंडिजचा हरहुन्नरी फलंदाज ब्रायन लारा याला तिसऱ्या स्थानावरील फलंदाज म्हणून नेमलं आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकरला चौथं स्थान दिलं आहे.
स्टीव वॉ संघाचा कर्णधारहरभजन सिंग यानं पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव वॉ यांना स्थान दिलं आहे. याशिवाय स्टीव वॉ यांना संघाचं कर्णधारपद देखील दिलं आहे. सहाव्या क्रमांकावर अष्टपैलू म्हणून संघात जॅक कॅलिसचा समावेश केला आहे.
विशेष म्हणजे यष्टीरक्षक म्हणून हरभजन सिंग यानं महेंद्रसिंग धोनी ऐवजी श्रीलंकेचा माजी फलंदाज कुमार संगकारा याचा समावेश केला आहे. सातव्या क्रमांकावर संगकाराची निवड हरभजननं केली आहे. गोलंदाजांमध्ये हरभजन सिंगनं वसीम अक्रम, ग्लेन मॅग्रा आणि जेम्स अँडरसन यांना वेगवान गोलंदाज म्हणून निवडलं आहे. तर फिरकीपटूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न याला स्थान दिलंय. तर श्रीलंकेच्या मुथैया मुरलीधरन याला १२ वा खेळाडू म्हणून निवडलं आहे.
असा आहे हरभजन सिंगनं निवडलेला संघ-अॅलिस्टर कुक, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर, स्टी वॉ (कर्णधार), जॅक कॅलिस, कुमार संगकारा (यष्टीरक्षक), शेन वॉर्न, वीसम अक्रम, ग्लेन मॅग्रा, जेम्स अँडरसन, मुथय्या मुरलीधरन (१२ वा खेळाडू)