कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानमध्येही काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आले आहेत. अशात गरीबांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि त्यांच्या मदतीसाठी पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी पुढे आला आहे. त्याच्या या समाजकार्याला भारताचे क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. भज्जी आणि युवी यांनी आफ्रिदीच्या या समाजकार्यात लोकांना हातभार लावण्याचं आवाहनही केलं आहे.
कोरोना व्हायरससाठी जगभरातून मदतीचा ओघ येत आहे. विविध क्षेत्रातील सेलिब्रेटी आपापल्या परीनं या समाजकार्यात हातभार लावताना दिसत आहेत. शाहिद आफ्रिदीच्या फाऊंडेशननं आतापर्यंत पाकिस्तानातील दोनशेहून अधिक गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचं काम केलं आहे. त्याच्या या समाजकार्याचं भज्जी आणि युवी यांनी कौतुक केलं आहे.
यापूर्वी हरभजन सिंगनेही ट्विट करून आफ्रिदीला पाठिंबा दिला. त्यानं लिहिलं की,'' शाहिद आफ्रिदी आणि त्याचं फाऊंडेशन चांगलं काम करत आहेत. त्याच्या कार्यात आपणही हातभार लावूया आणि जमेल तशी मदत करूया...''