नवी दिल्ली: भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंग (Harbhajan Singh) ने नुकतीच आपली नवी राजकीय इनिंग सुरू केली आहे. मात्र, राजकारणाऱ्या मैदानात उतरताच हरभजन सिंगने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवडून आल्यानंतर आपल्याला मिळणारा खासदारकीचा पूर्ण पगार शेतकऱ्यांच्या मुलींना देण्याचे हरभजन सिंग याने जाहीर केले आहे. या घोषणेनंतर हरभजन याच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हरभजन सिंग याला आम आदमी पक्षाच्या वतीने पंजाबमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली होती. बिनविरोध निवडून आल्यानंतर पहिल्याच फटक्यात देशवासीयांची मने हरभजन सिंग याने जिंकल्याचे सांगितले जात आहे. क्रिकेट वर्तुळासह देशभरात हरभजन सिंग याच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. यासंदर्भात हरभजन सिंगने ट्विट करून माहिती दिली आहे.
देशाच्या हितासाठी शक्य ते सर्वकाही करण्याचे आश्वासन
राज्यसभेचा खासदार म्हणून मला मिळणारे सर्व मानधन मी शेतकऱ्यांच्या मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या कल्याणासाठी देणार आहे. देशाच्या कल्याणासाठी मी राजकारणात आलो आहे. माझ्याकडून देशाच्या कल्याणासाठी जे काही करता येईल ते सर्व करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जय हिंद, असे ट्विट हरभजन सिंग याने केले आहे. आपल्या जादुई फिरकीच्या जोरावर अनेक दिग्गज फलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या हरभजन सिंह याने काही दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. हरभजन सिंह काँग्रेसमधून आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात होता. पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांची भेट घेतली होती. मात्र, हरभजन सिंगची आम आदमी पक्षाच्या नेत्यांसोबत जवळीक वाढली आणि त्याने 'आप'सोबत जाण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, आम आदमी पक्षाकडून हरभजन सिंग याच्यासह लव्हली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक मित्तल, आयआयटी दिल्लीचे प्रोफेसर संदीप पाठक, आपचे नेता राघव चड्ढा तसेच उद्योगपती संजीव अरोरा यांना आपने उमेदवारी दिली होती. हे सर्व उमेदवार राज्यसभेत बिनविरोध निवडून आले आहेत. याआधी आप पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीत ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळवून पंजाबमध्ये सत्ता स्थापन केलेली आहे.