नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जवळपास निश्चित आहे. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील कामगिरीनंतर संघात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वर्ल्ड कप संघात आपलं स्थान पक्कं, असा समज कुणी न केलेलाच बरा. भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग यानं मात्र वर्ल्ड कप संघासाठीचा भारतीय संघ निवडला आहे. भारतीय संघाचे नियमित सदस्य नसलेल्या दोन खेळाडूंना भज्जीने वर्ल्ड कपसाठीच्या संघात स्थान दिले आहे.
भज्जीनं 15 सदस्यीय संघात रिषभ पंतला स्थान न दिल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे सुनील गावस्कर व सौरव गांगुली या दिग्गजांनी पंत संघात हवा अशी मागणी केली आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड दौऱ्यात पंतला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळेच भज्जीनं त्याला वर्ल्ड कप संघात स्थान दिले नाही. मात्र, भज्जीनं जलदगती गोलंदाज उमेश यादव व अष्टपैलू खेळाडू विजय शंकर यांची निवड केली आहे. त्यात त्यानं अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला राखीव खेळाडू म्हणून स्थान दिले आहे.
हरभजनने फलंदाजांच्या फळीत रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव व दिनेश कार्तिक यांचा समावेश केला आहे. त्यात जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, विजय शंकर, कुलदीप यादव व युजवेंद्र चहल हे गोलंदाजीची धुरा सांभाळतील. संघात धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिक असणार आहे. भज्जीनं हा संघ समतोल असल्याची प्रतिक्रीया दिली आहे.
उमेश यादवची निवड सर्वांना बुचकळ्यात टाकणारी असली तरी नुकत्याच पार पडलेल्या रणजी करंडक स्पर्धेत त्याने धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याने चार सामन्यांत 24 विकेट्स घेतल्या होत्या. विजय शंकरने न्यूझीलंडविरुद्ध चांगली फलंदाजी केली, परंतु त्याला गोलंदाजीत छाप पाडता आली नाही.
भारताचा 15 सदस्यीय संघ रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अंबाती रायुडू, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक, उमेश यादव, विजय शंकर, राखीव खेळाडूः रवींद्र जडेजा.