विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विदर्भ संघाची कॅप्टन्सी करणारा अनुभवी फलंदाज करुण नायर आपल्या दमदार कामगिरीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या खेळाडूची धमाकेदार कामगिरी पाहिल्यावर त्याला पुन्हा टीम इंडियात संधी मिळायला हवी, अशा प्रतिक्रिया उमट आहेत. त्यात भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगही आघाडीवर आहे. त्यान तर भारताच्या दुसऱ्या त्रिशतकवीराला तत्कालीन निवडकर्तांनी संघाबाहेरचा रस्ता दाखवण्याचे कारण अजूनही कळलं नाही, असे म्हणत बीसीसआयवर निशणा साधला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकणाऱ्या ताऱ्यासाठी भज्जीची 'बोलंदाजी'
हरभजन सिंग याने आपल्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओच्या माध्यमातून करुण नायरसाठी 'बोलंदाजी' केलीये. तो म्हणाला की, विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने कमालीची कामगिरी केलीये. सहा डावात पाच वेळा नाबाद राहून त्याने ६६४ धावा केल्यात. ( सेमी फायनलनंतर हा आकडा ७ डावात ६ वेळा नाबाद ७५२ धावा) या कामगिरीनंतरही इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी त्याला टीम इंडियात स्थान मिळाले नाही, ते आश्चर्यकित करुन सोडणारे आहे.
रोहित-कोहलीचाही दिला दाखला
हरभजन सिंगने यावेळी रोहित विराटचा दाखला देत देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर करुण नायरला टीम इंडियात संधी का दिली जात नाही? असा प्रश्नही उपस्थितीत केलाय. काही खेळाडूंची निवड दोन सामन्यात होते. काही मंडळींना आयपीएलमधील कामगिरी पाहून टीम इंडियात एन्ट्री दिली जाते. मग त्याच्यासाठी (करुण नायर) वेगळा नियम का? रोहित शर्मा आणि विराट कोहली फॉर्ममध्ये नसल्यामुळे त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला जातोय. मग देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावा करणाऱ्याला टीम इंडियात संधी का दिली जात नाही? असा रोखठोक सवाल भज्जीनं बीसीसीआय निवडकर्त्यांना विचारला आहे. करुण नायर याने २०१६ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने त्रिशतक झळकावले. पण त्यानंतर तीन सामन्यानंतर त्याला संघाबाहेर काढण्यात आले. ही जुनी गोष्टही हरभजन सिंगनं उकरून काढलीये.
करुण नायरसंदर्भात नेमकं काय म्हणालाय हजरभजन सिंग?
त्रिशतक झळकावल्यानंतर त्याला टीम इंडियातून बाहेरचा रस्ता का दाखवला ते मला अजूनही कळलेले नाही. त्याच्यासारख्या प्रतिभावंत खेळाडूविषयी कोणीच काही बोलत नाही. इंग्लंड दौऱ्यावर तो टीम इंडियासोबत होता. पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली गेली नाही. पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारतातून एका खेळाडूला त्यावेळी बोलवण्यात आले. मला वाटतं तो हनुमा विहारी होता. नायरऐवजी त्याला संघात संधी मिळाली. यामागचं कारण कोणी सांगू शकेल का? हे समजण्यापलिकडे होते. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा नियम लागू करायचा हे बरं नाही. जर एखादा खेळाडू धावा करत असेल तर तुम्ही त्याला खेळवायला हवे. त्याने ना टॅटू काढलाय.. ना तो फॅन्सी कपड्यांत मिरवतो.. हे त्याला टीम इंडियात सिलेक्ट न करण्यामागचं कारणं आहे का? असा खोच प्रश्न उपस्थितीत करत भज्जीनं बीसीसीआय निवडकर्त्यांना टोला हाणला आहे.