नवी दिल्ली : हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांच्या महिलांवरील विवादास्पद विधानाचा भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने चांगलाच समाचार घेतला आहे. त्याने पांड्या व राहुल यांना शाब्दिक थप्पड लगावली. कॉफी विथ करण 6 कार्यक्रमात पांड्याने महिलांबद्दल अपमानजनक विधान केले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही (बीसीसीआय) त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आणि त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून माघारी परतावे लागले. पांड्याचे हे विधान भारतीय संस्कृतीचा अपमान असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही या विधानावर प्रतिक्रिया देणे टाळले. त्याचवेळी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हरभजन म्हणाला,''मी माझ्या मित्रांसोबत असतानाही असे विधान करत नाही. या दोघांनी तर सार्वजनिक ठिकाणी आणि तेही टिव्हीवर असे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे लोकांनाही असेच वाटेल की हरभजन सिंग असाच होता, अनिल कुंबळे आणि सचिन तेंडुलकर पण असेच होते का, हा प्रश्न लोकांना पडू लागला असेल.''
कॉफी विथ करण 6 या कार्यक्रमात या दोघांना त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले असता हार्दिकने कुटुंबीय खुलेपणाने माझ्या सेक्स लाइफबद्दल चर्चा करतात असे उत्तर दिले. तो पुढे म्हणाला,''एकदा आई-बाबांबरोबर एका पार्टीला गेलो होतो तेव्हा तेथे उपस्थित कोणत्या मुलीबरोबर शरीर संबंध झाल्याचे त्यांनी मला विचारले. त्यावेळी मी अनेकींकडे बोट दाखवले. आपलं कौमार्य गमावल्याबद्दलही मी पालकांना अगदी कूलपणे सांगितले. मी घरी आल्यावर पालकांना ‘आज मी करुन आलो’ असंही मी सांगतो.''
या दोघांवर केलेल्या निलंबनाच्या कामगिरीचे हरभजन सिंगने समर्थन केले. तो म्हणाला,''ही कारवाई अपेक्षितच होती. बीसीसीआयने योग्य पाऊल उचलले आहे. त्यामुळे याचे आश्चर्य नाही. संघाच्या बसमध्ये मला पत्नी व मुलीला सोबत घेऊन जावं लागेल आणि त्या बसमध्ये पांड्या व राहुल असतील, तर त्या बसमध्ये मी जाणार नाही. तुम्ही महिलांना त्याच भावनेतून पाहत असाल, तर ते चुकीचे आहे.