Join us  

Harbhajan Singh vs Mohammad Amir: 'मोहम्मद आमीरशी मी बोलावं इतकी त्याची औकात नाही'; हरभजन सिंग पुन्हा संतापला

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर (Mohammad Amir) आणि भारतीय दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांच्यातील वाद काही केल्या शमताना दिसत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 5:38 PM

Open in App

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर (Mohammad Amir) आणि भारतीय दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांच्यातील वाद काही केल्या शमताना दिसत नाही. आज पुन्हा एकदा हरभजन सिंग यानं मोहम्मद आमीरवर निशाणा साधला आहे. मोहम्मद आमीरशी मी बोलावं इतकी त्याची औकात नाही, असं कठोर शब्दांत हरभजन सिंग यानं मोहम्मद आमीरला सुनावलं आहे. 

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर ट्विटरवर मोहम्मद आमीर आणि हरभजन सिंग यांच्यात वाद सुरू झाला. मोहम्मद आमीर यानं हरभजन सिंग याची कळ काढत एका कसोटी सामन्यात शाहिद आफ्रिदीनं एकाच षटकात हरभजनला लगावलेल्या चार षटकारांची आठवण करुन दिली. त्यावर हरभजननंही जशास तसं प्रत्युत्तर देत आमीरला मॅच फिक्सिंग प्रकरणाची आठवण करुन दिली होती. 

इथवरच हरभजन थांबला नाही. तर त्यानं एक नव्हे, दोन व्हिडिओ शेअर करत मोहम्मद आमीरला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. आशिया चषकात मोहम्मद आमीरच्या गोलंदाजीवर हरभजन सिंगनं खणखणीत षटकार खेचत भारतीय संघाला विजय प्राप्त करुन दिला होता. त्याचा व्हिडिओ हरभजननं ट्विट करत आमीरला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. आता हरभजननं पुन्हा एकदा मोहम्मद आमीरवर टीका केली आहे. 

"जर मी दलदलीत उतरलो तर माझ्यावरची चिखल उडेल. त्यामुळे मी त्यात जात नाही. मोहम्मद आमीरची इतकी औकात नाही की मी त्याच्याबाबत बोलावं. जितकं जास्त मी त्याच्याबाबत बोलेन तितका माझाच अपमान होईल असं मी समजतो. मला त्याच्याशी बोलायचं नाही. तो एक कलंक आहे. त्यानं जागतिक क्रिकेटला ज्यापद्धतीनं कलंक फासला ते कुणीच कधी विसरू शकत नाही. ज्या व्यक्तीनं क्रिकेटला विकलं, आपला देश, इमान आणि आत्म सन्मानाची बोली लावली त्याच्याबद्दल मी काय बोलायचं. मी खरंतर त्याच्या ट्विटलाही उत्तर द्यायला नको होतं. कारण तो मूर्ख आहे", असं हरभजन एका यूट्यूब कार्यक्रमात म्हणाला आहे. 

टॅग्स :हरभजन सिंगपाकिस्तानट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App