भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहनं पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे उपचारासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे. त्यासाठी तो लंडनमध्येही गेला होता. त्याच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने ( बीसीसीआय) दिली. त्यानंतर बुमराह मायदेशात परतला, परंतु या वर्षात तरी त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन शक्य नाही. दुखापतीतून तंदुरुस्त होण्यासाठी कसून मेहनत घेणाऱ्या बुमराहनं नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. त्यावरून भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी बुमराहची फिरकी घेतली. भज्जीनं तर बुमराहची तुलना बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्याशी केली.
बुमराहच्या दुखापतीबाबत IANSला संघ व्यवस्थापनातील सूत्रांनी सांगितले होते की,'' बांगलादेशविरुद्धची मालिका ही कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे लक्ष्य नाही. त्यामुळे बुमराहने पूर्णपणे तंदुरूस्त व्हावे अशी दोघांची इच्छा आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो खेळणार नाही. 2020चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप हे टीम इंडियाचे लक्ष्य आहे आणि त्यासाठी बुमराहला तंदुरुस्त ठेवणे, महत्त्वाचे आहे.''
''वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून तो कमबॅक करू शकतो. बुमराहच्या बाबतीत संघ व्यवस्थापनाला कोणताही शॉर्टकट घ्यायचा नाही. पुर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर त्याचे पुनरागमन होईल. त्यामुळे बांगलादेश मालिकेपर्यंत तो बरा होण्याची शक्यता कमी आहे,'' असे सूत्रांनी सांगितले होते. त्यानंतर बुमराह तंदुरूस्तीसाठी कसून मेहनत घेत आहे. बुमराहच्या फोटोवर युवी, भज्जी आणि अक्षर पटेल यांनी कमेंट केली. भज्जीनं तर बुमराहची तुलना दिग्गज नेते देव आनंद यांच्याशी केली.