gt vs rr 2023 । अहमदाबाद : भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग नेहमी त्याच्या विधानांमुळे चर्चेत असतो. आयपीएलमध्ये (IPL 2023) काल झालेल्या राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर देखील भज्जीने एक विधान केले असून सर्वांचे लक्ष वेधले आहे. काल संजू सॅमसनच्याराजस्थान रॉयल्सने गतविजेत्या हार्दिक पांड्याच्या संघाचा पराभव करून २ गुण मिळवले. कर्णधार संजू सॅमसनने ३२ चेंडूत ६० धावांची स्फोटक खेळी करून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ७ बाद १७७ धावा केल्या होत्या.
१७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला सुरूवातीलाच दोन मोठे धक्के बसले. यशस्वी जैस्वाल (१) आणि जोस बटलर (०) स्वस्तात माघारी परतले. संघ अडचणीत असताना कर्णधार संजू सॅमसनने डाव सांभाळला आणि ६ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ६० धावा कुटल्या. नूर अहमदने सॅमसनला बाद केल्यानंतर शिमरॉन हेटमायरने मोर्चा सांभाळताना २६ चेंडूत ५६ धावा करून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. राजस्थान रॉयल्सने १९.२ षटकांत १७९ धावा करून गतविजेत्यांना पराभवाची धूळ चारली.
संजू सॅमसनवर प्रेमाचा वर्षावराजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचे कौतुक करताना हरभजन सिंगने एक मोठे विधान केले आहे. याशिवाय महेंद्रसिंग धोनीचा दाखला देत त्याने सॅमसनचे तोंडभरून कौतुक केले आहे. "जर तुमचा तुमच्या खेळावर विश्वास असेल तर तुम्ही शेवटपर्यंत सामना नेऊ शकता. धोनी शेवटपर्यंत सामना घेऊन जायचा. कारण त्याच्या खेळीवर त्याला विश्वास असायचा. काल झालेल्या सामन्यात शिमरॉन हेटमायरनेही अशीच कामगिरी करत सामना शेवटपर्यंत नेला. संजूनेही सामना शेवटपर्यंत नेला. त्याच्यात इतकी क्षमता आहे की तो भारतासाठी नक्कीच खेळू शकतो. त्याच्यातही धोनीसारखी प्रतिभा आहे."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"