harbhajan singh । इंदूर : सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून यजमान संघाने आघाडी घेतली होती, मात्र तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजयाचे खाते उघडले आहे. खरं तर या मालिकेतील तिन्ही सामने 3 दिवसांच्या आतच संपले. यावर भारतीय कर्णधार रोहित शर्माने विधान केले ज्याला भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने असमहती दर्शवली आहे. अशा खेळपट्ट्यांवर फलंदाजांनी खेळण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, असेही रोहित शर्मा म्हणाला. दुसरीकडे, खेळपट्ट्या अशा नसाव्यात, की सामना अडीच दिवसांतच संपेल आणि गोलंदाजांना अजिबात काम करावे लागणार नाही, असे हरभजन सिंगने म्हटले आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरूद्ध इंदूर येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. ऑस्ट्रेलियाने शानदार खेळी करून सामना अडीच दिवसांतच जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने 19 व्या षटकात एक गडी गमावून मालिकेतील पहिला विजय मिळवताना 76 धावांचे लक्ष्य सहज गाठले.
रोहित शर्माच्या विधानावर हरभजनची असहमतीसामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेसाठी आला आणि यादरम्यान त्याला सामने तीन दिवसांत संपत असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना रोहितने म्हटले, "आम्हाला सामना अनिर्णित ठेवायचा नव्हता कारण लोकांना तो कंटाळवाणा वाटतो. आम्हाला निकाल हवे आहेत आणि फलंदाजांनीही अशा खेळपट्ट्यांवर खेळण्यासाठी कठोर परिश्रम करावेत."
दुसरीकडे रोहित शर्माच्या या वक्तव्याबाबत हरभजन सिंगला विचारले असता त्याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले, "रोहित शर्माला निकाल हवा आहे हे चांगले आहे पण सामन्याचा निकाल अडीच दिवसात येऊ नये. खेळ पाचव्या दिवसापर्यंत चालला पाहिजे. अशी खेळपट्टी असावी जिथे गोलंदाजांना बळी घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. येथे गोलंदाज मेहनत नसून मजुरी करत होते. सगळी मेहनत फलंदाजांनी का करावी, गोलंदाजांनाही थोडी मेहनत करू द्या."
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"