भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग याने महिन्याभरापूर्वीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने शेवटचा सामना २०१६ साली खेळला होता. पण IPLच्या गेल्या हंगामापर्यंत तो क्रिकेट खेळत होता. अखेर त्याने काही दिवसांपूर्वी क्रिकेटला रामराम ठोकला. या निवृत्तीनंतर हरभजन येत्या IPL मध्ये सपोर्ट कोच किंवा मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा रंगली होती. तशातच त्याने पंजाब काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिदधू यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांनी उधाण आले होते. तशातच शनिवारी पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. त्यामुळे आता IPL 2022 की पंजाब निवडणुका... हरभजन सिंग यापैकी कोणता मार्ग स्वीकारणार याकडे साऱ्यांचे लक्ष असताना त्याच्याकडून एक उत्तर मिळालं.
![]()
हरभजन सिंगने एका वृत्तसंस्थेला उत्तर देताना सांगितलं, "मला भविष्यात नक्की काय करायचंय याचा मला शांतपणे बसून विचार करावा लागणार आहे. माझी सध्या जी ओळख आहे ती क्रिकेट खेळामुळे आहे. मी कायमच खेळाच्या आसपास राहणं पसंत करेन. क्रिकेटसंबंधी काही गोष्टी करण्याच्या माझ्या योजना आहेत. क्रिकेटशी जोडलं जाण्याच्या दृष्टीने मी काही ना काही करत राहिन. मी कदाचित एखाद्या IPL संघाशी जोडला जाईन किंवा समालोचन करेन. पण मी राजकारणाच्या वाटेवर जाईन की नाही हे आताच सांगणं कठीण आहे."
"राजकारणात प्रवेश करायचा की नाही यावर आताच बोलणं घाईचं ठरेल. कदाचित जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळी मी त्याबद्दल निर्णय घेईन की पुढे राजकारणात जायचं की नाही. म्हणूनच राजकारणाबाबत मी आता निश्चित काहीच बोलू शकणार नाही. राजकारणात प्रवेश करण्याआधी मला खरंच त्यात जायचं आहे का याचा विचार करावा लागेल. सध्यातरी मी इतकंच सांगेन की मी क्रिकेटशी संबंधित गोष्टींचा विचार करतोय. लवकरच तुम्ही मला एखाद्या संघाशी जोडलं गेलेलं पाहाल", असंही हरभजनने स्पष्ट केलं.
Web Title: Harbhajan SIngh Future Plan IPL or Politics Punjab Election See What Bhajji Answers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.