विराट कोहली ( Virat Kohli) ७१वं आंतरराष्ट्रीय शतक केव्हा पूर्ण करेल, या प्रश्नाचं उत्तर मागील दोन-अडीच वर्षांपासून चाहत्यांना सापडलेलं नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ७९ धावा ही त्याची नोव्हेंबर २०१९नंतरची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळेच त्यानं फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तीनही प्रकारच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले आहे. अशात आता विराटवर संघाबाहेर होण्याचीही टांगती तलवार लटकत आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग ( Harbhajan Singh) यानं तसा इशारा विराटला दिला आहे. आता चांगली कामगिरी करण्यासाठीचं दडपण आणखी वाढलं आहे, असंही भज्जीला वाटतं. चांगली कामगिरी न केल्यास त्याचे संघातील स्थानही धोक्यात येऊ शकते, असे मत भज्जीनं एका यूट्युब चॅनलशी बोलताना व्यक्त केलं.
कर्णधार झाल्यानंतर तुमच्या डोक्यातून संघातील निवडीबाबतचं टेंशन दूर होतं, परंतु आता हे पद गेल्यावर संघातील जागा टीकवण्यासाठी चांगली कामगिरी करणे गरजेचं आहे, असे भज्जी म्हणाला. '' सात वर्ष यशस्वी कर्णधारपद भूषविल्यानंतर जेव्हा तुम्ही या पदावरून हटण्याचा निर्णय घेता, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसणे साहजिक आहे, मलाही आश्चर्य वाटले. विराट इतक्या लवकर हा निर्णय घेईल, याचा मी अंदाजही बांधला नव्हता. पण, त्याला माहित्येय की काय करायला हवं. कर्णधार नसल्यावर तुमच्यासाठी आता गोष्टीही बदलतात. फलंदाज म्हणून आता विराटवर दडपण असेल, कारण आता त्याला संघातील स्थान टिकवायचे आहे,''असे हरभजन सिंगनं स्पष्ट केलं.
तो पुढे म्हणाला,''कर्णधार म्हणून तुमचे संघातील स्थान कायम असते. पण, जेव्हा तुम्ही कर्णधारपदावर नसता आणि कामगिरी चांगली करण्यात अपयशी ठरता, तेव्हा निवडीची चिंता तुमच्या डोक्यात येते. मागील सात वर्ष विराटला ही चिंता कधी सतावली नाही, परंतु आता पुढे परिस्थिती तशी नसेल. त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. कर्णधार असताना त्यानं जो खेळ करून दाखवला, तोच आता फलंदाज म्हणून तो करेल, असा मला विश्वास आहे.''