Join us  

Harbhajan Singh in Politics: हरभजन सिंग राजकारणात प्रवेश करणार? भज्जीने स्वत:चं दिलं उत्तर

हरभजनने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताच माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांची भेट घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 4:09 PM

Open in App

Harbhajan Singh in Politics: भारताचा अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंग याने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. २०१६ पासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला नव्हता. पण IPL 2021 च्या हंगामात मात्र त्याला तीन सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर अखेर त्याने २३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीवर पडदा टाकला. आता हरभजन भविष्यात समालोचन करणार, एखाद्या IPL संघाचा प्रशिक्षक होणार की राजकारणात प्रवेश करणार? यावरून चर्चा सुरू आहे. असे असतानाच भज्जीने नवज्योत सिंग सिद्धू यांची भेट घेतल्याने चर्चांना जोर आला होता. अशातच भज्जीने स्वत: या संदर्भात स्पष्टीकरण दिले.

"मी प्रत्येक राजकीय पक्षातील अनेकांना ओळखतो. मी राजकारणाच्या किंवा इतर कोणत्याही रूपाने पंजाबच्या लोकांची सेवा करणार आहे. पण माझा नक्की प्लॅन काय याबद्दल मी अद्याप निर्णय घेतलेला नाही. राजकारणात जायचं की नाही याबद्दल मी अजून विचार केलेला नाही. वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून मला राजकारणाच्या ऑफर्स आल्या आहेत. त्याबद्दल शांतपणे आणि हुशारीने विचार करेन. पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी नवज्योत सिंग सिद्ध यांना एक माजी क्रिकेटपटू म्हणून भेटलो होतो. त्यामुळे जर मी राजकारणात प्रवेश करणार असेन तर तशी घोषणा मी आधीच करेन", असं हरभजनने स्पष्टपणे सांगितलं.

हरभजनने निवृत्ती जाहीर केल्यानंतर क्रिकेट जाणकारांच्या मते, सध्या तरी हरभजन सिंग एखाद्या आयपीएल संघाच्या प्रशिक्षकपदी किंवा फिरकी मार्गदर्शकपदी दिसू शकतो. तसेच, IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये एखाद्या संघाला योग्य खेळाडू निवडण्याच्या प्रक्रियेत मदत करण्याच्या दृष्टीने हरभजनचा अनुभव नक्कीच उपयुक्त ठरू शकतो. हरभजनने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन यशस्वी संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे चांगलाच दांडगा अनुभव आहे. तशातच, त्याने नवज्योत सिंग सिद्ध यांची भेट घेतल्याने तो काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्याही चर्चा रंगल्या.

Open in App