Harbhajan Singh KL Rahul : भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून केएल राहुलची जरदार चर्चा होत आहे. T20 विश्वचषक असो वा बांगलादेश दौरा, प्रत्येक वेळी केएल राहुलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे, केएल राहुल फक्त संघातच राहिला नाही, तर त्याने उपकर्णधारपदही भूषवले. यावरुन माजी खेळाडूंनी आपली मते व्यक्त केली आहेत.
माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा आणि व्यंकटेश प्रसाद यांच्यात केएल राहुलच्या निवडीवरुन सोशल मीडियावर वाद झाल्याचे पाहायला मिळाले. केएल राहुल बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेत टीम इंडियासाठी सलामीला येत आहे. मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत राहुल अपयशी ठरला. यानंतर त्याच्याकडून कसोटी संघाचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले. सतत टीकेला सामोरे जाणाऱ्या केएल राहुलला आता हरभजन सिंगची साथ मिळाली आहे. हरभजन सिंगही केएल राहुलच्या बाजूने मैदानात उतरला आहे. हरभजनने ट्विटमधून केएल राहुलला एकटे सोडण्याचे आवाहन केले आहे.
हरभजन सिंगने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'आपण केएल राहुलला एकटे सोडू शकतो का मित्रांनो? त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. तो अजूनही सर्वोत्तम खेळाडू आहे. तो जोरदार पुनरागमन करेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण सगळेच अशा टप्प्यांतून जातो. तो असा पहिला किंवा शेवटचा खेळाडू नाही. त्यामुळे कृपया तो आपलाच भारतीय खेळाडू आहे, याचा आदर करा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा.'