Join us  

विराट-रोहित आणखी किती खेळणार? दोघांच्या निवृत्तीवर भज्जीची भविष्यवाणी

वनडे आणि कसोटीत रोहित-विराट आणखी किती काळ टिकतील?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 7:01 PM

Open in App

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. जेतेपद पटकावल्यानंतर एकापाठोपाठ एक दोघांनी घेतलेला निर्णय मोक्यावर परफेक्ट चौका मारण्यातला प्रकार होता. या निर्णयामुळे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्द आणखी लांबवण्यासाठी त्यांना निश्चितच फायदा होईल, पण क्रिकेटच्या या दोन प्रकारामध्ये ही जोडी किती काळ टिकेल? या प्रश्नावर हरभजन सिंगनं आपलं मत व्यक्त केले आहे. 

हरभजन सिंगनं किंग कोहलीसह विराट रोहितच्या निवृत्तीवर केलं भाष्य

दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन हरभजन सिंग याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताच्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कारकिर्दीसंदर्भात भाष्य केले. अपेक्षेप्रमाणे रोहित शर्माच्या तुलनेत विराट कोहली अधिक काळ खेळेल, अशी भविष्यवाणी हरभजन सिंग याने केली आहे. कोहलीचा पल्ला हा रोहितच्या दुपट्टीनं अधिक असेल, असेही तो म्हणाला आहे. 

फिटनेसच्या बाबतीत १९ वर्षाच्या क्रिकेटरला कोहलीसोबत स्पर्धा करायला लावा

भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाला की, विराट कोहली हा सर्वोत्तम फिटनेस असणारा खेळाडू आहे. त्याच्या इतका फिट खेळाडू सध्यातरी संघात दुसरा कोणी नाही. कमालीच्या फिटनेसच्या जोरावर तो आणखी ५ वर्षे अगदी सहज खेळू शकेल. दुसरीकडे रोहित शर्मा अधिकाधिक २ वर्षे खेळताना दिसेल."  कोणत्याही १९ वर्षीय खेळाडूला फिटनेसच्या बाबतीत विराट कोहलीशी स्पर्धा करायला सांगा. इथं विराट कोहलीच बाजी मारेल. इतका तो फिट आहे. विराट आणि रोहित दोघांमध्ये खूप क्रिकेट बाकी आहे. शेवटी फिटनेस आणि कामगिरी उत्तम आहे तोपर्यंत त्यांनी खेळावे. 

जो खेळत नाही त्याला बाहेर काढा

निवडकर्त्यांनी संघ निवड करताना कामगिरी विचारात घेणे अपेक्षित असते. एखाद्या खेळाडूची कामगिरी ढासळली तर त्याला बाहेरचा रस्ता दाखवा. मग तो वरिष्ठ खेळाडू असो व कनिष्ट. जोपर्यंत फिट आहात आणि धावा करण्यातही हिट आहात तोपर्यंत खेळाडूला संधी मिळायलाच हवी. पण फिटनेस आणि धावांसह योगदान देता येत नसेल, तर वरिष्ठांनी स्वत: युवा क्रिकेटर्ससाठी जागा मोकळी करायला पाहिजे, ही गोष्ट ही भज्जीनं बोलून दाखवली. युवा खेळाडूंमध्ये धावा किंवा विकेट्सच्या बाबतीत वरिष्ठ खेळाडूंच्या तुलनेत अधिक भूक असते. १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ खेळणाऱ्या खेळाडूच्या तुलनेत युवा जोश कधीही भारी, असेही त्याने म्हटले आहे.

  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरोहित शर्माविराट कोहलीहरभजन सिंग