नवी दिल्ली : 2008 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घडलेल्या MonkeyGate प्रकरणाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. या प्रकरणात माफी मागताना भारताचा फिरकीपटून हरभजन सिंग ढसाढसा रडला होता, असा दावा ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अँड्रयू सायमंड्सने नुकताच केला. त्यावर सडेतोड उत्तर देताना भज्जीने ऑसी क्रिकेटपटूचा चांगलाच समाचार घेतला आहे.
2008 दौऱ्याच्या सिडनी कसोटीत हरभजन सिंगने सायमंड्सला बाद केल्यावर जल्लोषात काही टिपण्णी केली होती. सायमंड्सला तो उच्चार व्यवस्थीत समजला नाही. त्याला वाटले हरभजनने त्याला 'मंकी' म्हटले आहे. त्यावर सायमंड्सने सामना अधिकाऱ्याकडे हरभजनने वर्णभेदी टिप्पणी केल्याची तक्रार नोंदवली होती. त्यावेळी हरभजनला तीन कसोटी सामने बंदीची शिक्षा झाली होती. भारताच्या संघ व्यवस्थापनाने याचा निषेध करत पुन्हा सुनावणी घेण्याचा आग्रह केला.
सायमंड्सने सांगितले की, आम्ही एका व्यक्तीकडे भोजनासाठी गेलो होतो. आमचा संपूर्ण संघ होता आणि तेथे हरभजन देखील होता. त्यावेळी त्याने माझी माफी मागितली. तो माफी मागताना रडत होता.