नवी दिल्ली : भारताच्या सर्वांत यशस्वी फिरकी गोलंदाजांपैकी एक ऑफस्पिनर हरभजनसिंग याने शुक्रवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच, या दिग्गज खेळाडूची २३ वर्षांची कारकीर्द संपली. पंजाबच्या ४१ वर्षांच्या या खेळाडूने १०३ कसोटीत ४१७, २३६ वन डेत २६९ आणि टी-२० त २५ गडी बाद केले आहेत.
हरभजनने १९९८ ला शारजा येथे न्यूझीलंडविरुद्ध वन डेत पदार्पण केले होते. भारतासाठी त्याने ढाका येथे २०१६ ला यूएईविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळला. मार्च २००१ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध भज्जीने तीन सामन्यात तब्बल ३२ गडी बाद केले होते. त्यात भारतीय गोलंदाजाने घेतलेल्या पहिल्या कसोटी हॅट्ट्रिकचा देखील समावेश होता.
आयपीएलमध्ये एखाद्या संघाच्या सपोर्ट स्टाफची भूमिका बजाविण्याची भज्जीची इच्छा आहे. भज्जीने पहिली कसोटी १९९८ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. २०१५ ला श्रीलंकेविरुद्ध खेळलेली कसोटी त्याची अखेरची ठरली. हरभजन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. यंदा तो केकेआर संघात होता. मात्र दुसऱ्या टप्प्यात त्याला एकही सामना खेळता आला नाही. मार्च २००१ ला कोलकाता येथे दुसऱ्या कसोटीत हरभजनने ७२ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज रिकी पॉंटिंग (६), ॲडम गिलख्रिस्ट (००) आणि शेन वॉर्न (००) यांना पाठोपाठ बाद करीत ऐतिहासिक हॅट्ट्रिक साधली होती.
क्रिकेटविश्वाकडून प्रशंसा
सचिनने लिहिले, ‘भज्जीचे संपूर्ण करिअर शानदार ठरले. १९९५ ला भारतीय संघाच्या नेट सरावात मी पहिल्यांदा त्याला पाहिले. इतकी वर्षे आम्ही सोबत घालवली. मैदानात आणि बाहेर स्वत:ला झोकून देणारा भज्जी खऱ्यार्थाने ‘टीम मॅन’ आहे. तुला दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा!’
एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाले, ‘अविस्मरणीय कारकीर्दीसाठी अभिनंदन. तू उत्कृष्ट ऑफस्पिनर, फलंदाज आणि स्पर्धात्मक खेळाडू राहिला. भारताच्या शानदार विजयाचा सूत्रधार ठरलास. उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!’
आयपीएल २००८ ला हरभजनने वेगवान गोलंदाज एस. श्रीसंत याच्या थोबाडीत मारली होती. श्रीसंतने लिहिले, ‘भज्जी जगातील सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहे. तुझ्यासोबत खेळणे माझ्यासाठी गौरवास्पद ठरले.’
आंतरराष्ट्रीय कामगिरी...
- सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या जगातील गोलंदाजांमध्ये हरभजन १४ व्या स्थानावर आहे. भारतीय गोलंदाजांमध्ये तो चौथ्या स्थानावर असून त्याच्यापुढे अनिल कुंबळे (६१९), कपिल देव (४३४) आणि रविचंद्रन अश्विन (४२७) हे आहेत.
प्रतिस्पर्धी देशांविरुद्ध भज्जीचे कसोटी बळी
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध १८ सामन्यांत ९५ बळी- द. आफ्रिकेविरुद्ध ११ सामन्यांत ६० बळी- वेस्ट इंडिजविरुद्ध ११ सामन्यांत ५६ बळी- श्रीलंकेविरुद्ध १६ सामन्यांत ५३ बळी- इंग्लंडविरुद्ध १४ सामन्यांत ४५ बळी
सर्वांत यशस्वी कसोटी सत्र
- २००२ : १३ सामन्यांत ६३ बळी (पाचवेळा पाचपेक्षा अधिक बळी)- २००१ : १२ सामन्यांत ६० बळी (६ वेळा पाचपेक्षा अधिक, दोनवेळा दहापेक्षा अधिक बळी)
कसोटीत सर्वोत्कृष्ट गोलंदाजी
- १८ मार्च २००१ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८४ धावांत ८ बळी
वन डेत सर्वाधिक बळी
- श्रीलंकेविरुद्ध ४७ सामन्यांत ६१ बळी- इंग्लंडविरुद्ध २३ सामन्यांत ३६ बळी- वेस्ट इंडिजविरुद्ध ३१ सामन्यांत ३३ बळी- ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३५ सामन्यांत ३२ बळी- द. आफ्रिकेविरुद्ध २४ सामन्यांत ३१ बळी