BCCI vs PCB । नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याबाबत मोठे विधान केले आहे. सध्या कतारची राजधानी दोहा येथे लीजेंड्स लीग क्रिकेट खेळत असलेल्या हरभजन सिंगने स्पष्टपणे सांगितले की, भारतीय संघ पाकिस्तानात अजिबात जाणार नाही. खरं तर आशिया चषकाच्या मुद्द्यावरून मागील काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यात वाद सुरू आहे.
दरम्यान, आगामी आशिया चषकाचे आयोजन नियोजित वेळापत्रकानुसार पाकिस्तानात होणार आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे. अशातच पाकिस्तानने देखील आक्रमक पवित्रा घेत भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकात सहभागी न होण्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध सध्या खूपच बिघडत चालले आहेत. या मुद्द्यावर दोन्ही देशांचे माजी क्रिकेटपटू आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. अशा स्थितीत भारताने पाकिस्तानात जाऊ नये, असे हरभजन सिंगने कडक शब्दांत म्हटले आहे.
आमचे खेळाडू कसे सुरक्षित राहतील - हरभजन एका मुलाखतीदरम्यान हरभजन सिंगने म्हटले की, भारतीय संघाने पाकिस्तानला जाऊ नये कारण तेथील परिस्थिती चांगली नाही. तसेच पाकिस्तानच्या लोकांना स्वत:ला सुरक्षित वाटत नाही, अशा परिस्थितीत तिथे आपल्या खेळाडूंची सुरक्षा कशी होणार? भारताने आपल्या खेळाडूंना तिथे पाठवण्याचा धोका पत्करू नये, असेही हरभजन सिंगने म्हटले.
क्वेटामधील स्फोटाच्या घटनेचा संदर्भ देत हरभजन सिंग म्हणाला की, "तिथली परिस्थिती चांगली नाही, काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सुपर लीगच्या सामन्यादरम्यान क्वेटामध्ये मोठा स्फोट झाला होता, कराचीमध्ये स्फोट झाला होता. याशिवाय इम्रान खान यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. तिथे भारतीय संघ का जाईल?" तसेच जेव्हा-जेव्हा दोन्ही देशांदरम्यान क्रिकेट मालिका खेळली गेली, त्यावेळी परिस्थिती ठीक होती, पण आता परिस्थिती तशी राहिली नाही, आधी वातावरण सुधारले पाहिजे तरच भारत-पाकिस्तान क्रिकेट शक्य आहे, असे हरभजनने स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"