Join us  

हरभजन सिंगला मोठा धक्का; IPL मधून घेऊ शकतो निवृत्ती

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर आहे. आर अश्विनच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर भज्जीच्या कारकिर्दीला उतरती कळा ...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 10:16 AM

Open in App

भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर आहे. आर अश्विनच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर भज्जीच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. बरीच वर्ष भज्जी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही ( 2016 आशिया चषक) सक्रीय नाही. शिवाय तो पंजाबकडूनही खेळत नाहीय. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करत आहे, परंतु त्याला आता IPL मधून निवृत्ती घ्यायला लागू शकते. इंग्लंडमध्ये होणाऱ्या दी 100 क्रिकेट स्पर्धेसाठीच्या खेळाडूंच्या ड्राफ्टमध्ये भज्जीच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. जुलै 2020मध्ये या स्पर्धेचे पहिले सत्र खेळवण्यात येणार आहे. मात्र, बीसीसीआयच्या नियमानुसार त्याला दी 100 स्पर्धेत खेळण्यासाठी त्याला IPL मधून निवृत्ती घ्यावी लागणार आहे.

मागील दोन वर्ष भज्जी चेन्नईकडून खेळत आहे आणि महेंद्रसिंग धोनी त्याला पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करण्याची संधी देतो. त्यानं त्यातही आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. मागील दोन सत्रात त्यांन 23 विकेट्स घेतल्या आहेत. पण दी 100 स्पर्धेत खेळण्यास बीसीसीआयची त्याला परवानगी नाही.''हरभजन सिंगने ना हरकत प्रमाणपत्र घेतलेलं नाही. त्यामुळे तो असं कोणत्याही लीगमध्ये स्वतःचं नाव नोंदवू शकत नाही. हे बीसीसीआयच्या नियमांत बसत नाही. बीसीसीआयच्या सदस्यांनी याबाबत त्याच्याशी चर्चा केली आणि त्यानं कोणत्याही लीगमध्ये नाव नोंदवले नसल्याचे सांगितले,'' अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितली.

हरभजन आता 39 वर्षांचा आहे. त्यानं अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली नाही आणि तो अजूनही IPL मध्ये खेळत आहे. बीसीसीआयच्या नियमानुसार क्रिकेटमध्ये सक्रिय असलेला कोणताही भारतीय खेळाडून अन्य लीगमध्ये सहभागी होऊ शकत नाही. याच नियमामुळे युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय आणि IPL मधून नुकतीच निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्याला कॅनडात झालेल्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली.

पण, सूत्रांच्या माहितीनुसार हरभजन सिंग दी 100 लीगमध्ये खेळण्यासाठी इच्छुक आहे. भज्जीच्या नावावर 417 कसोटी विकेट्स आहेत आणि पुढील वर्षी होणाऱ्या लीगमध्ये त्याची निवड होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पुढील आयपीएलपूर्वीच तो निवृत्ती जाहीर करू शकतो. 

टॅग्स :हरभजन सिंगआयपीएलचेन्नई सुपर किंग्सयुवराज सिंग