Join us  

हरभजन सिंगने शेअर केला अंडर-१९ संघात असतानाचा फोटो, म्हणाला, यांना ओळखून दाखवाच...

Harbhajan Singh : या फोटोमध्ये हरभजन सिंगसोबत जे दोन क्रिकेटपटू आहेत त्यांच्यामधील एक आहे दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू Imran Tahir आणि दुसरा आहे पाकिस्तानचा फलंदाज Hasan Raza.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 6:11 PM

Open in App

मुंबई - भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फिरकीपटूंपैकी एक असलेला हरभजन सिंग सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. तसेच तो वेगवेगळे फोटोही शेअर करत असतो. दरम्यान, हरभजनने आज सोशल मीडिया अकाऊंटवर कारकिर्दीतील सुरुवातीच्या दिवसांमधील एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये हरभजन सिंगसोबत दोन अन्य क्रिकेटपटूही दिसत आहेत. हा फोटो शेअर करत भज्जीने क्रिकेटप्रेमींना त्याच्यासोबत असलेल्या दोन क्रिकेटपटूंना ओळखून दाखवण्याचे आव्हान दिले आहे. 

याबाबत हरभजनने सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, ओळखून दाखवा... १९ वर्षांखालील विश्वचषकाचे दिवस १९९८-९९. दरम्यान, या फोटोमध्ये हरभजन सिंगसोबत जे दोन क्रिकेटपटू आहेत त्यांच्यामधील एक आहे दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीर आणि दुसरा आहे पाकिस्तानचा फलंदाज हसन रझा. या फोटोमध्ये इम्रान ताहिर शर्टलेस दिसत आहे. हा १९९८-९९ च्या विश्वचषकादरम्यानचा फोटो आहे. ही विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळली गेली होती. तेव्हा भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवणे शक्य झाले नव्हते. मात्र पुढच्या विश्वचषकात भारताने विजेतेपद पटकावले होते. पण त्या संघात हरभजनचा समावेश नव्हता.

इम्रान ताहिरने दक्षिण आफ्रिकेमध्ये जाण्यापूर्वी पाकिस्तानकडून ज्युनिअर पातळीवरील क्रिकेट खेळले होते. त्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेचे २० कसोटी, १०७ वनडे आणि ३८ टी-२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले होते. तर हसन रझाने ७ कसोटी आणि १६ एकदिवसीय सामन्यामध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते.

या तिघांमध्ये हरभजन सिंग सर्वात यशस्वी ठरला होता. त्याने १०३ कसोटी, २३६ एकदिवसीय आणि २८ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच २००७चा टी-२० विश्वचषक आणि २०११ च्या एकदिवसीय  विश्वचषक जिंकणाऱ्या संघामध्ये हरभजन सिंगचा समावेश होता. 

टॅग्स :हरभजन सिंगआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App