भारतीय संघाने गाबा कसोटी सामना जिंकला, तर मालिकाही जिंकेल, असा दावा टीम इंडियाचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगने केला आहे. याच वेळी, शनिवारपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासंदर्भात भज्जी म्हणाला, गाब्बा कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. पर्थ कसोटीनंतरच्या गॅपमुळे भारतीय संघाचे मोमेंटम तुटले. पण, दोन्ही संघांमध्ये पुनरागमन करण्याची क्षमता आहे. मायदेशात 3-0 ने कसोटी मालिका गमावल्यानंतर भारताने पर्थ कसोटीत विजय मिळवला आणि ऑस्ट्रेलियाने ॲडलेडमध्ये बाऊंस बॅक केले.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना हरभजन म्हणाला, "ही मालिका देखील कठीण आहे कारण दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पर्थमध्ये ऑस्ट्रेलियासोबत जे घडले, कदाचित त्यांना ते अपेक्षित नव्हते आणि ॲडलेडमध्ये भारतासोबत जे घडले. कदाचित ते भारतालाही अपेक्षित नव्हते. दोन कसोटींमध्ये मोठा गॅप होता. मात्र हा गॅप अनेक वेळा सातत्य बिघडवतो आणि इथेही तेच झाले. यानंतर भज्जीने शनिवार 14 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या गब्बा कसोटी सामन्यासंदर्भात भाष्य केले..
हरभजन पुढे म्हणाला, "आपण तीन सामन्यांची मालिका म्हणून बघितल्यास, भारताला यांपैकी दोन सामने जिंकावे लागतील. तसेच मला वाटते की, त्यांच्यासाठी सर्वोत्तम संधी सिडनी आणि मेलबर्नमध्ये असेल. जर आपण गाबामध्ये चांगला खेळ केला आणि विजय मिळवला, तर आपण मेलबर्न अथवा सिडनीपैकी एक सामना नक्कीच जिंकू शकतो. यासंदर्भात आपण विचार करायला हवा. पहिल्या दोन टेस्टचा विचार करता दोन्ही संघांमध्ये पुनरागमाची क्षमता आहे. ऑस्ट्रेलियाने पुनरागमन केले आहे. आता भारताची वेळ आहे."