इस्लामाबाद - भारतीय क्रिकेटर हरभजन सिंग पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीच्या मदतीसाठी पुढे सरसारवला आहे. शाहिद अफ्रिदीच्या संस्थेला मदत करण्यासाठी हरभजन सिंगने पुढाकार घेतला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हरभजन सिंगसोबत फोटो शेअर करत शाहिद अफ्रिदीने लिहिलं आहे की, 'प्रेम, शांतता आणि माणुसकीसाठी सर्व बंधनं तोडत आणि सीमारेषा पार करतोय. एसएफए फाऊंडेशनला पाठिंबा दिल्याबद्दल हरभजन सिंगचे आभार'.
एखाद्या भारतीय क्रिकेटरने शाहिद अफ्रिदीच्या संस्थेला मदत करण्याची ही काही पहिलीचे वेळ नाही. याआधी कर्णधार विराट कोहलीने गुडविल म्हणून आपली स्वाक्षरी असलेली बॅट शाहिद अफ्रिदीच्या संस्थेला भेट म्हणून दिली होती. यानंतर शाहिद अफ्रिदीने ट्विटरला फोटो ट्विट करत विराट कोहलीचे आभार मानले होते. गरिबांसाठी काम करणा-या या संस्थेला विराट कोहलीला अनेक गोष्टी भेट म्हणून दिल्या आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीच्या संस्थेसाठी बॅट गिफ्ट दिली होती. शाहीद आफ्रिदीने ट्विटरवर या बॅटचा फोटो शेअर करत थँक्यू विराट कोहली असे लिहिले होते. विशेष म्हणजे विराट कोहलीने अशा प्रकारे पाकिस्तानी खेळाडूला खास गिफ्ट देण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. याआधी ईडन गार्डन्स मैदानावर भारत - पाकिस्तान सामना पार पडला होता. त्यावेळी विराट कोहलीने पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीरला आपली बॅट गिफ्ट केली होती.
दरम्यान, शाहिद आफ्रिदीने निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीची जर्सी त्याला भेट दिली होती. इतकंच नाही तर या जर्सीवर टीम इंडियाच्या खेळाडूंची स्वाक्षरी आहे. तुमच्यासोबत खेळणं हा नेहमीच सर्वोत्तम अनुभव होता, असं विराटच्या जर्सीवर लिहिलेलं होतं. या जर्सीवर कोहलीसोबत, युवराज सिंह, आशीष नेहरा, जसप्रीत बुमरा, सुरेश रैना, पवन नेगी, मोहम्मद शमी, रवींद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, हार्दिक पांड्या आणि टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री यांची सही आहे. एका पाकिस्तानी पत्रकाराने हा फोटो ट्विटरवर शेअर केला होता.