मुंबई - सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असणारा भारतीय क्रिकेटर हरभजन सिंहने ट्विटरवर जवानांसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. मात्र याच फोटोमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं. झालं असं होतं की, हरभजन सिंगने सीआरपीएफ जवानांसोबतचा फोटो पोस्ट करताना त्यांचा उल्लेख भारतीय लष्कर असा केला. त्याने लिहिलं होतं की, 'माझ्या भावांसोबत, इंडियन आर्मी, जय हिंद!'. हरभजन सिंगच्या या पोस्टनंतर लोकांनी त्याची खिल्ली उडवत भारतीय लष्कर जवान आणि निमलष्करी दलातील जवानांमधील फरक सांगण्यास सुरुवात केली.
एका युजरने ट्विट केलं की, 'तुम्ही जवानांना प्रेरणा देत आहात याचा आनंद आहे. पण तुमचा आदर राखत मी सांगू इच्छितो की हे निमलष्करी दलाचे जवान आहेत, भारतीय लष्कराचे नाही. कृपया भारतीय लष्कराला जितकं महत्व दिलं जात, तितकंच महत्व निमलष्करी दलाला द्यावं. हे जवान खूप मेहनत करतात आणि सर्व श्रेय भारतीय लष्कराला दिलं जातं'. हरभजनने पोस्ट केलेल्या फोटोवरुन अनेक युजर्स अशाच प्रकारच्या कमेंट करत आहेत.
हरभजन सिंग अनेकदा ट्विटरवर भारतीय लष्कर आणि जवानांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने तसंच त्यांचे धन्यवाद मानत फोटो पोस्ट करत असतो. लष्कर दिन असतानाही त्याने फोटो पोस्ट करत जवानांचे आभार मानले होते. याशिवाय नववर्षालाही हरभजन सिंगने जवानांसोबतचा फोटो पोस्ट करत भारताची सुरक्षा करत असल्याचे आभार मानले होते. हरभजन सिंगने ट्विट केलं होतं की, 'ज्यावेळी आपले लोक नववर्षाच्या आगमनाचं स्वागत करत होते, तेव्हा हे जवान आपली रक्षा करत होते. माझ्या या भावांना माझ्याकडून धन्यवाद आणि नववर्षाच्या शुभेच्छा'.
हरभजन सिंग गेल्या काही दिवसांपासून संघाबाहेर आहे. सध्या तो आयपीएलची तयारी करण्यात व्यस्त आहे. आयपीएलच्या 11 व्या हंगामात हरभजन सिंग चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. चेन्नईने दोन कोटींमध्ये त्याला खरेदी केलं आहे.