१९ नोव्हेंबर २०२३ हा भारतीय चाहत्यांच्या मनावर घाव करून गेलेला दिवस... वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची अपराजित मालिका रोखली गेली, तिही फायनलमध्ये... ऑस्ट्रेलियासारख्या चिवट प्रतिस्पर्धी फायनलमध्ये आला तेव्हाच चाहत्यांची धाकधुक वाढली होती. भलेही साखळी सामन्याच्या पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाला रोहित शर्मा अँड टीमने पराभूत केले असले तरी फायनल ही फायनलच असते.. ऑस्ट्रेलियन संघ हा आयसीसी स्पर्धांमध्ये 'दादा' राहिला आहे आणि ते कालची सिद्ध झालं..
World Cup Final : भारतीय संघाचे काहीच चुकले नाही, ॲास्ट्रेलिया आज फक्त चांगली खेळली!
भारतीय संघाने या वर्ल्ड कप स्पर्धेत सलग १० विजय मिळवून अंतिम फेरी गाठली होती. स्पर्धेतील संघाची कामगिरी पाहता हा वर्ल्ड कप आपलाच असं भारतीयांच्या मनावर कोरले गेले होते. पण, फलंदाजीत आलेलं अपयश अन् त्यानंतर गोलंदाजांवर वाढलेलं दडपण, यामुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकता आला नाही. २०११ नंतर भारताची वन डे वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याची प्रतीक्षा कायम राहिली आहे. आता पुढील वर्ल्ड कप २०२७मध्ये दक्षिण आफ्रिकेत आहे. तोपर्यंत कालच्या फायनलचे दुःख मनात कायम राहिल.
पराभवानंतर रोहित शर्मा, विराट कोहली, मोहम्मद सिराज यांच्यासह प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. महान फलंदाज सचिन तेंडुलकर त्या सर्वांचे सांत्वन करण्यासाठी मैदानावर आलेला पाहिला. सचिनने भारतीय खेळाडूंच्या पाठीवर मायेचा हात फिरवला. त्याचवेळी क्रिकेटच्या देवाने ऑस्ट्रेलियाचेही कौतुक केले. त्याने पोस्ट केले की, सहावा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन... मोठ्या व्यासपीठावरील सर्वात महत्त्वाच्या दिवशी त्यांनी चांगले क्रिकेट खेळून दाखवले. टीम इंडियासाठी शुभेच्छा, स्पर्धेत फक्त एक वाईट दिवस हृदयद्रावक असू शकतो. खेळाडू, चाहते आणि हितचिंतक यांच्या यातना आणि त्रास मी समजू शकतो. पराभव हा खेळाचा एक भाग आहे, परंतु या संघाने संपूर्ण स्पर्धेत आपल्याला निखळ आनंद दिला.''