पार्ल : ‘कारकिर्दीतील प्रत्येक कठीण काळाने मला मानसिकरीत्या कणखर बनवले. पण मनातील स्पष्टता आणि शांत राहिल्यानेच मी या कालावधीतून पुढे जाण्यास यशस्वी ठरलो,’ असे मत भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन याने व्यक्त केले. देशांतर्गत क्रिकेटमधील खराब कामगिरीमुळे धवनवर अनेक टीका झाली. मात्र, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ७९ धावांची खेळी केली.
सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना धवनला नकारात्मकतेपासून स्वत:ला कसे दूर ठेवतोस? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर धवन म्हणाला की, ‘मी मीडियातील वृत्त ऐकत नाही आणि मी वर्तमानपत्रही वाचत नाही, तसेच बातम्याही पाहत नाही. त्यामुळे अशा गोष्टींची मला माहिती नसते. मला माझ्या खेळावर विश्वास आहे आणि यावर माझा विचार स्पष्ट आहे. मी नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. त्यामुळे हे काही नवीन नाही. माझ्या कारकिर्दीत हे पहिल्यांदा किंवा शेवटचे होत नाहीये. असा कालखंडच मला कणखर बनवतो.’
आफ्रिका दौरा सुरू होण्याआधी विजय हजारे चषक स्पर्धेत धवनची कामगिरी ०, १२, १४, १८ आणि १२ अशी झाली होती. मात्र, नंतर त्याला संघाबाहेर बसवण्यात यावे अशी चर्चा रंगली, तेव्हा त्याने अर्धशतक झळकावून टीकाकारांना गप्प केले.
पहिल्या सामन्यातील संघाच्या कामगिरीबाबत धवन म्हणाला की, ‘आम्ही वेगाने बळी गमावले. याचा फलंदाजीवर मोठा परिणाम झाला. आम्ही सुरुवात चांगली केली होती. खेळपट्टी थोडी संथ होती आणि फिरकीला मदतही करत होती. त्यामुळे ३०० धावांचा पाठलाग करताना मधल्या फळीतील फलंदाजांसाठी फलंदाजी काहीशी आव्हानात्मक बनते.’
Web Title: Hard times made me tough says shikhar dhwan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.