मुंबई - भारतीय संघात स्थान मिळवण्याची स्पर्धा गेल्या काही दिवसांमध्ये कमालीची वाढली आहे. त्यामुळे संघात स्थान टिकवणे अनेक खेळाडूंसाठी आव्हानात्मक ठरत आहे. दरम्यान, भारतीय संघातील एका स्टास खेळाडूची कारकीर्द जवळपास संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. हा खेळाडू लवकरच निवृत्तीची घोषणा करू शकतो. आता या खेळाडूचं भारतीय संघातील पुनरागमन कठीण झालं आहे. तसेच त्याचं संघात पुनरागमन झाल्यास तो एक चमत्कार ठरेल. या खेळाडूचं नाव आहे. इशांत शर्मा.
इशांत शर्माला सध्या भारतीय संघामध्ये स्थान मिळणं दुरापास्त झालं आहे. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या त्रिकुटाचं संघातील स्थान सध्या पक्कं असल्याने आणि त्यांच्या दिमतीला शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव असे पर्याय मिळाल्याने निवड समितीकडून इशांत शर्माचा गोलंदाज म्हणून संघासाठी विचार करणं बंद केलं आहे.
भारताकडून १०० कसोटी सामने खेळण्याचा मान मिळवणाऱ्या इशांत शर्माची कारकीर्द गेल्या काही वर्षांत सातत्याने उतरणीला लागली होती. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून त्याचं नाव कधीच बाद झालं होतं. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आपला दबदबा राखला होता. मात्र गतवर्षीच्या इंग्लंड दौऱ्यात त्याला तीन सामन्यात केवळ ५ बळी टिपता आले होते. तर न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत त्याला एकही बळी मिळवता आला नव्हता. तेव्हापासून त्याला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही.
इशांत किशनने आपल्या कसोटी कारकीर्दीत १०० कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३११ बळी टिपले आहेत. त्याने आपला पहिला कसोटी सामना २००७ मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता.