ठळक मुद्देभारतीय संघाची द वॉल, मिस्टर डिफेंटेबल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड त्याचे क्रिकेटच्याप्रति समर्पण आणि शिस्तप्रियतेसाठी विख्यात होता. आज विश्वचषक उंचावणाऱ्या भारतीय संघातील अनेक युवा चेहरे भारतीय क्रिकेटचे भविष्यातील हिरे आहेत.
शनिवारचा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अजून एक ऐतिहासिक दिवस ठरला. १९ वर्षांखालील मुलांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवा क्रिकेटपटूंनी ऑस्ट्रेलियाला नमवत चौथ्यांदा विश्वचषकाला गवसणी घातली. या यशामध्ये कर्णधार पृथ्वी शॉ आणि सहकाऱ्यांचा जसा हात होता. तसेच अजून एका व्यक्तीच्या मेहनतीचा मोलाचा वाटा आहे, ती व्यक्ती म्हणजे युवा भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड.
एक फलंदाज म्हणून आपली कारकीर्द गाजवणाऱ्या द्रविडला भारताच्या विश्वविजेत्या संघाचा भाग बनण्याचे सौभाग्य कधी लाभले नाही. २००३ साली विश्वचषक जिंकण्याची भारतीय संघाची संधी थोडक्यात हुकली होती. तर २००७ साली द्रविडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजमधील विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी साफ निराशाजनक झाली होती. मात्र खेळाडू म्हणून जे शक्य झाले नाही ते प्रशिक्षक म्हणून साध्य करण्याची संधी नियतीने द्रविडला दिली.
भारतीय संघाची द वॉल, मिस्टर डिफेंटेबल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड त्याचे क्रिकेटच्याप्रति समर्पण आणि शिस्तप्रियतेसाठी विख्यात होता. त्याचे क्रिकेटचे ज्ञान अफाट आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर प्रशिक्षक म्हणून तो यशस्वी ठरेल, असा सर्वांचाच होरा होता.
त्यात सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविडला बीसीसीआयने निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेटमध्ये विविध जबाबदाऱ्या सोपवल्या. मात्र द्रविडने भारतीय क्रिकेटच्या भविष्याला दिशा देण्यासाठी भारत अ आणि १९ वर्षांखालील संघांच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली.
खरंतर द्रविडसारख्या मोठ्या क्रिकेटपटूने दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील संघांची जबाबदारी स्वीकारणे आश्चर्यकारक होते. पण त्याने ही जबाबदारी निष्ठेने निभावली. तसा राजस्थान रॉयल्सचा मेंटॉर म्हणून त्याला प्रशिक्षक पदाचा अनुभव होताच. त्यात द्रविडचे मार्गदर्शन युवा उपयुक्त ठरत असल्याचे समोर येत असल्याने त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या.
आज विश्वचषक उंचावणाऱ्या भारतीय संघातील अनेक युवा चेहरे भारतीय क्रिकेटचे भविष्यातील हिरे आहेत. पण त्यांना पैलू पाडण्याचं काम द्रविड नावाच्या क्रिकेटमधील कुशल जवाहीरानं केलंय. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर द्रविडने या युवा क्रिकेटपटूंसोबत बराच काळ व्यतित केला. म्हणूनच १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी जेव्हा भारताचा युवा संघ रवाना झाला तेव्हा या संघाकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले गेले. अखेर द्रविडची ही मेहनत आज फळाला आली. भारतीय युवा संघाने आज विश्वचषक जिंकला, पण या विजया एवढीच मोलाची बाब म्हणजे गुणवान युवा क्रिकेटपटू मिळण्याची परंपरा यावेळीही कायम राहिलीय.
Web Title: Hard work done!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.