नवी दिल्ली : भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने गुरुवारी (१८जुलै) मोठी घोषणा केली आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविचने अखेर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांमधील घटस्फोटासंदर्भातील माहिती हार्दिक पांड्याने एक लांबलचक आणि भावनिक इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे.
आपल्या या भावनिक पोस्टमध्ये हार्दिक पांड्याने मुलगा अगस्त्यचाही उल्लेख केला आहे. आम्ही जरी वेगळे होत असलो तरीही आमचा मुलगा अगस्त्य याला आम्ही आई-वडीलांचे प्रेम कमी पडू देणार नाही. आम्ही दोघेही त्याची काळजी घेऊ, असे हार्दिक पांड्याने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी मॉडेल नताशा स्टँकोविच यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियात सुरु होत्या. अखेर हार्दिक आणि नताशा यांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला. हार्दिक आणि नताशाचा चार वर्षांचा संसार अखेर मोडला आहे.
हार्दिक पांड्याने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे?हार्दिकने पोस्टमध्ये म्हटले आहे की, "चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि हे नाते वाचवण्यासाठी सर्व काही दिले. पण आता आम्हा दोघांसाठी हाच योग्य निर्णय आहे असे आम्हाला वाटते. आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. एकत्र घालवलेले आनंदाचे क्षण, परस्परांचा आदर आणि एकमेकांचा सहवास घेत आम्ही एक कुटुंब म्हणून वाटचाल केली."
मुलगा अगस्त्य याच्याबद्दलही त्यांनी लिहिले- "मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात अगस्त्य आहे, जो नेहमी आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असेल. आम्ही दोघे मिळून त्याची काळजी घेऊ. त्याला जगातील सर्व सुख मिळावे यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू आणि त्याच्या आनंदासाठी जे काही करता येईल ते करू. या कठीण आणि संवेदनशील काळात आम्हाला प्रायव्हेसी देण्याची आणि समजून घेण्याची मनापासून विनंती करतो."