नवी दिल्ली : भारतीय संघातील अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि यष्टिरक्षक- फलंदाज ऋषभ पंत हे दोघे अखेरच्या पाच षटकात प्रतिस्पर्धी संघासाठी धोकादायक ठरू शकतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत या दोन्ही खेळाडूंचा डेथ ओव्हरमधील खेळ पाहण्यासारखा असेल, असे मत माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने आयपीएल पदार्पणात विजेतेपद मिळवले. भन्नाट कामगिरीच्या जोरावर त्याचा टीम इंडियात प्रवेश झाला. हार्दिकने फलंदाजीसोबत गोलंदाजीतदेखील कमाल केली. भारतीय संघ ९ जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. एका मुलाखतीत गावसकर म्हणाले, ‘हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत हे दोन असे खेळाडू आहेत जे ५-६ क्रमांकावर फलंदाजी करून १०० ते १२० धावा करू शकतात. नुकत्याच संपलेल्या आयपीएलच्या १५व्या सत्रात सर्वांची नजर हार्दिकवर होती. सहापेक्षा अधिक महिन्यांपासून तो राष्ट्रीय संघात परत येण्याचा प्रयत्न करीत होता.
टी-२० विश्वचषक २०२१ मधील पराभवानंतर हार्दिक टीम इंडियाकडून खेळला नव्हता. आयपीएल २०२२मध्ये तो मैदानावर परतला. हार्दिकने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासह फिटनेस आणि नेतृत्व गुणदेखील दाखवला. टायटन्सकडून खेळताना हार्दिकने चौथ्या क्रमांकावर एक वेगळीच भूमिका पार पाडली. गोलंदाजीत काही सामन्यात त्याने मोहम्मद शमीसोबत सुरुवात केली. अर्थात आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याला सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते.
दुसऱ्या बाजूला ऋषभ पंतसाठी आयपीएलचा हंगाम फार चांगला ठरला नाही. आता पुढील मालिकेत तो मोठी धावसंख्या करण्यास उत्सुक असेल.’ गावसकरांच्या मते भारताचे हे दोन खेळाडू अखेरच्या ६ षटकात १२० पर्यंत मोठी धावसंख्या उभी करू शकतात. या दोघांनी पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर वादळी फलंदाजी केल्यास प्रतिस्पर्धी संघांसाठी ते ‘किलर’ठरतील.