Hardik Pandya Team India: सध्या भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी२० सामन्यांची मालिका खेळत आहे. यानंतर भारताला आयर्लंडच्या दौऱ्यावर जायचे आहे. त्यासाठी संघ जाहीर करण्यात आला. या मालिकेसाठी निवड समितीने टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवले आहे. भारतीय संघाला आयर्लंड दौऱ्यावर दोन टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून मैदानात उतरल्याने तब्बल ६३ वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे.
यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये जानेवारीपासून आतापर्यंत ४ खेळाडूंनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. हार्दिक पांड्या हा यंदाच्या वर्षात संघाचे नेतृत्व करणारा पाचवा कर्णधार असेल. असा योगायोग ६३ वर्षांपूर्वी घडला होता. ६३ वर्षांपूर्वी म्हणजे १९५९ मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व ५ खेळाडूंनी केले होते. हेमू अधिकारी, दत्ता गायकवाड, विनू मांकड, गुलाबभाई रामचंद आणि पंकज रॉय या पाच कर्णधारांनी एकाच वर्षी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर या वर्षी रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या हे पाच जण संघाचे कर्णधार होणार आहेत.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि ऋषभ पंत यांनी या वर्षीच्या जानेवारीपासून म्हणजेच २०२२ पासून भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. वर्षाच्या सुरुवातीला कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी मालिकेत संघाचे नेतृत्व केले तर राहुलने वन डे मालिकेचे नेतृत्व केले. त्यानंतर रोहित शर्माने वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशात कर्णधारपद सांभाळले. सध्या रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे. पण आयर्लंड विरुद्धच्या पुढील मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह रिषभ पंतलाही विश्रांती देण्यात आली आहे. तर लोकेश राहुल जखमी झाला आहे. त्यामुळे हे चौघेही या मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.