मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या फ्रँचायझीने पाच जेतेपदं पटकावली. आता हार्दिक पांड्याकडे MI चे कर्णधारपद सोपवले गेले आहे. मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना हा निर्णय पटलेला नाही, पण महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. हार्दिकने जेव्हा मुंबई इंडियन्सची साथ सोडून गुजरात टायटन्ससोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हाही काही चाहते नाराज झाले होते. पण, हार्दिने नेतृत्वकौशल्य दाखवून गुजरातला पहिल्याच पर्वात जेतेपद पटकावून दिले आणि २०२३ मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले. या प्रवासातील हार्दिकचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मागील दोन वर्षांतील रोहित शर्माचं योगदान पाहा...! हार्दिकच्या कॅप्टन्सीला महान खेळाडूचा पाठिंबा
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत हार्दिकने मुंबई इंडियन्स हा सुपरस्टार्सचा संघ असल्याचे म्हटले होते आणि त्यावर रोहितचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. सोशल मीडियावरील या दोन्ही प्रतिक्रिया तुफान व्हायरल झालेल्या आणि आता हार्दिकच्या घरवापसीने पुन्हा त्याची चर्चा सुरू झाली आहे. हार्दिक पांड्या जेव्हा गुजरात टायटन्सकडे गेलो होता तेव्हा त्याने आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे दोन मार्ग समजावून सांगितले होते. एक तर सर्वोत्तम खेळाडूला खरेदी करा आणि दुसरा संघात सर्वोत्तम वातावरण निर्माण करा. हार्दिकच्या मते मुंबई इंडियन्स हा पहिल्या मार्गाने जाणारा संघ आहे.
पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, डेवॉल्ड ब्रेव्हिस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद यांना कायम राखले आहे. अर्जुन तेंडुलकरने मागील पर्वात आयपीएलमध्ये पदार्पण करताना ठिकठाक कामगिरी केली होती. तोही संघात कायम आहे. शॅम्स मुलानी, नेहाल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयुष चावला, आकाश माधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड ( ट्रेड लखनौ सुपरजायंट्स) यांना कायम राखले आहे.