Hardik Pandya, Team India: मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) चार वेळा खेळाडू म्हणून IPL ट्रॉफी उंचावलेल्या हार्दिक पांड्याने रविवारी पहिल्यांदा संघाचा कर्णधार म्हणून ट्रॉफी जिंकली. गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिकने फायनल सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही क्षेत्रात उत्तम कामगिरी करून दाखवत संघाला पदार्पणाच्या हंगामातच विजेतेपद मिळवून दिलं. हार्दिक अप्रतिम नेतृत्वशैलीची साऱ्यांनाच भुरळ पडली. हार्दिक पांड्या आणि आशिष नेहरा या जोडीचा क्रिकेट जाणकारांनी उदो-उदो केला. याच दरम्यान, हार्दिक पांड्याबद्दल इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने एक मोठं विधान केलं.
IPLच्या २०२२ हंगामाची सुरूवात होण्याआधी हार्दिक पांड्या फिटनेसमुळे संघाबाहेर होता. तो गुजरातच्या संघात कसा खेळेल, गोलंदाजी करेल का, नेतृत्व कसे करेल, असे अनेक सवाल अनेकांच्या मनात होते. त्या साऱ्या प्रश्नांची हार्दिकने आपल्या कामगिरीच्या माध्यमातून उत्तरं दिली. हार्दिकच्या कर्णधारपदावरही अनेक क्रिकेट जाणकार खुश झाले. याचबाबत बोलताना, हार्दिक भारताचा भविष्यातील कर्णधार होऊ शकतो, असा विश्वास मायकल वॉनने व्यक्त केला. "नव्या कोऱ्या संघाने IPL जिंकणे ही उत्तम कामगिरी आहे. टीम इंडियाला पुढील २ वर्षांत नव्या कर्णधाराची गरज भासली, तर मी नक्कीच हार्दिक पांड्याव्यतिरिक्त इतर कोणाचा विचार करणार नाही", असे ट्वीट वॉनने केले.
हार्दिकला जिंकायचाय टी२० वर्ल्ड कप!
गुजरात टायटन्सने ट्रॉफी जिंकल्यानंतर हार्दिकला भविष्यातील स्वप्नांबद्दल विचारले. त्यावेळी त्याने टी२० वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा व्यक्त केली. ''भारताकडून खेळणे म्हणजे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. मग ते कितीही सामने असोत. देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो. भारतीय संघाचा सदस्य म्हणून मला खूप प्रेम व पाठिंबा मिळाला. त्यामुळे लाँग टर्म असो किंवा शॉर्ट टर्म मला कोणत्याही परिस्थितीत वर्ल्ड कप जिंकायचा आहे,''असे हार्दिक म्हणाला.