India at T20 World Cup 2022 - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताच्या संघात कोण कोण असेल याचे उत्तर BCCI ने १५ सदस्यीय संघ जाहीर करून दिले. मागच्या वर्षी पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ६ खेळाडूंना डच्चू देत BCCI ने हा संघ जाहीर केला. १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप सुरू होतोय आणि २३ ऑक्टोबरला भारताचा पहिला मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्याविरुद्धच आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, जसप्रीत बुमराह यांच्या कामगिरीकडे सर्व आशेने पाहणार आहेत. पण, महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी वेगळ्याच खेळाडूची मॅच विनर म्हणून निवड केली आहे.
विराट, जड्डूव्यतिरिक्त भारताच्या ३ खेळाडूंसाठी यंदाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असेल शेवटचा!
गावस्करांनी आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) मॅच विनर ठरेल, असा दावा केला आहे. वर्ल्ड कपमध्ये पाचवा जलदगती गोलंदाज म्हणून आणि मॅच विनर फलंदाज म्हणून हार्दिकवर जबाबदारी असणार आहे. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध त्याने अष्टपैलू कामगिरी करून त्याची झलक दाखवली होती. त्याचे वर्ल्ड कप संघात असण्यावर गावस्करांनी आनंद व्यक्त केला आणि रवी शास्त्रींची तुलना केली. ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या १९८५च्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत रवी शास्त्रींनी जी कामगिरी करून दाखवली, त्याची पुनरावृत्ती हार्दिक करेल असा दावा गावस्करांनी केला आहे.
''१९८५ मध्ये रवी शास्त्रीने जी उल्लेखनीय कामगिरी केली होती, तशीच हार्दिक यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये करेल, असा माझा अंदाज आहे. तो काही अप्रतिम झेलही टिपेल. हार्दिक पांड्या सक्षम खेळाडू आहे,''असे गावस्करांनी इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. १९८५च्या वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत शास्त्रींनी ५ सामन्यांत १८२ धावा केल्या होत्या आणि ८ विकेट्सही घेतल्या होत्या. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात ६३ धावा व १ विकेट्स घेत शास्त्रींनी भारताला गावस्करांच्या नेतृत्वाखाली जेतेपद पटकावून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
''पाठिच्या दुखापतीनंतर हार्दिकने पुनरागमन केले आहे. त्यामुळे त्याचा योग्य वापर करून घेणे गरजेचा आहे. तो मॅच विनर खेळाडू आहे. फक्त गोलंदाजी-फलंदाजीत नव्हे क्षेत्ररक्षणातही त्याची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. १९८५मध्ये रवी शास्त्रीने जशी कामगिरी केली होती, तशी हार्दिकने केल्यास मला आश्चर्य वाटणार नाही,''असेही गावस्कर म्हणाले.