Hardik Pandya, Team India: T20 World Cup 2022 मधील टीम इंडियाचा प्रवास सेमीफायनलमध्ये संपला. इंग्लंडने भारताला धूळ चारली आणि नंतर विश्वविजेतेही बनले. आता टी२० विश्वचषकानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. या दौऱ्यासाठी संघातील अनेक खेळाडू न्यूझीलंडला पोहोचले आहेत. टीम इंडियाचा डॅशिंग अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या टी२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघात अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे, पण एक खेळाडू सातत्याने संघाबाहेरच आहे. हार्दिक पांड्याचे संघात कमबॅक झाल्यापासूनच त्या खेळाडूला संधी मिळणे विरळ झाले आहे, असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.
पांड्या संघात परतला तेव्हापासून 'हा' संघाबाहेरच!
युवा अष्टपैलू व्यंकटेश अय्यरचा न्यूझीलंड दौऱ्यासाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही. IPL 2022 पासून व्यंकटेश अय्यरने टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही. व्यंकटेश अय्यर हा देखील हार्दिक पांड्यासारख्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो, तसेच तो मध्यमगती गोलंदाजीही करतो. मात्र हार्दिक पांड्याच्या शानदार खेळामुळे त्याला आता संघात संधी मिळत नाहीये.
पांड्या जायबंदी असताना अय्यरने जागा घेतली होती
हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टी२० विश्वचषक 2021 पासून टीम इंडियातून बाहेर होता. हार्दिक पांड्याऐवजी व्यंकटेश अय्यर दीर्घकाळ टीम इंडियाची पहिली पसंती राहिला. व्यंकटेश अय्यरने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात पदार्पण केले, पण हार्दिक पांड्या संघात आल्यापासून त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
टीम इंडियातील कामगिरी
व्यंकटेश अय्यरने भारतीय संघासाठी 9 टी-20 सामन्यात 133 धावा केल्या आहेत आणि 5 बळी घेतले. त्याचबरोबर त्याने टीम इंडियासाठी 2 टी-20 सामनेही खेळले. वेंकटेश अय्यरची IPL 2022 नंतर दक्षिण आफ्रिका मालिका आणि आयर्लंड मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात निवड झाली होती, परंतु त्याला एकदाही प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट करण्यात आले नव्हते.