Instagram Fastest 1 Million Likes: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) संघासाठी मोलाची कामगिरी बजावली. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात त्याने छाप सोडली. संघानं विक्रमी जेतेपद मिळवल्यावर पांड्याचे सेलिब्रेशन अन् त्यावेळीचा त्याचा अंदाज बघण्याजोगा होता. व्हाइट ब्लेझर घालून त्याने पुन्हा एकदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील क्षण ताजा केला. जुन्या अंदाजातील नव्या सेलिब्रेशनसह हार्दिक पांड्याने एक नवा विक्रम सेट केलाय. त्याची आयकॉनिक पोजमधील पोस्ट इन्स्टाग्रामवर अल्पावधिक १ मिलियन लाइक्स मिळवणारी ठरलीये. याबाबतीत हार्दिक पांड्याने किंग कोहलीला मागे टाकले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अवघ्या ६ मिनिटांत १ मिलियन लाइक्स
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत न्यूझीलंडला पराभूत केल्यावर हार्दिक पांड्या ट्रॉफी घेऊन खेळपट्टीवर गेला. ट्रॉफी खेळपट्टीवर ठेवत पांड्याने आपला जुना स्वॅग नव्याने दाखवला. अक्षर पटेलला त्याने तो फोटो क्लिक करायला लावला. पांड्यानं हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच आयकॉनिक पोजला तुफान लोकप्रियता मिळाली. अवघ्या ६ मिनिटांत पांड्याच्या पोस्टवर १ मिलियन लाइक्स आल्या. हा एक नवा विक्रम आहे. याआधी कमी वेळात १ मिलियन लाइक्स मिळवण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावे होता. टी-२० वर्ल्ड कप सेलिब्रेशनच्या कोहलीची पोस्ट चांगलीच गाजली होती.
किंग कोहलीचा हा फोटो ठरला होता लोकप्रिय
भारतीय संघानं २०२४ मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यावर विराट कोहलीचा अंदाज चर्चेत राहिला होता. भारतीय संघाच्या विजयानंतर विराट कोहलीनं ट्रॉफीसोबत शेअर केलेले फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. त्यावेळी विराट कोहलीच्या इन्स्टाग्राम पोस्टला ७ मिनिटांत १ मिलियन लाइक्स मिळाल्या होत्या. हा एक रेकॉर्डच होतो. हा विक्रम आता हार्दिक पांड्याच्या पोस्टमुळे मागे पडलाय.
सोशल मीडियावर नेहमीच दिसतो त्याचा तोरा
हार्दिक पांड्या हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. अनेकदा तो आपल्या पोस्टमधून स्टायलिश अंदाज अन् महागड्या जीवनशैलीची खास झलक दाखवून देताना दिसून येते. या क्रिकेटरचे इन्स्टाग्रामवर ३८.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याने ज्या पोस्टसह नवा विक्रम सेट केलाय ती पोस्ट १६ मिलियनपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी लाइक केलीये.
Web Title: Hardik Pandya Fastest 1 Million Like On Instagram In India 6 Minutes And Break Virat Kohli Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.