Hardik Pandya Team India: भारतीय संघाचा तडाखेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेले काही महिने सर्व प्रकारच्या क्रिकेटपासून दूरच आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेत त्याला संधी मिळाली होती, पण त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. त्यानंतर दुखापत आणि विश्रांती यासाठी त्याने ब्रेक घेतला. विंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी तरी हार्दिकचं संघात पुनरागमन होईल अशी चाहत्यांना अपेक्षा होती पण तसं झालं नाही. हार्दिकला वन डे आणि टी२० अशा दोन्ही मालिकांसाठी संघात स्थान देण्यात आलं नाही. संघ जाहीर झाल्यावर हार्दिक नक्की कुठे आहे? तो संघात का नाही? त्याचं करियर संपलं का? अशा अनेक प्रश्नांना तोंड फुटलं. त्यानंतर अखेर इतके दिवस गप्प असलेल्या हार्दिक पांड्याने मौन सोडत सर्व गोष्टींचा खुलासा केला.
"मी संघाचा विचार करून आधी थोडी घाईच केली होती. पण यावेळी मी मानसिक आणि शारीरिकरित्या पूर्णपणे सज्ज होण्यासाठी थोडा जास्त मोठा ब्रेक घेतला आहे. मला माझ्या कुटुंबासाठी थोडा वेळ काढायचा होता. बायो बबलमध्ये मी बराच वेळ घालवला होता. तेथे आपलं कुटुंब जरी आपल्यासोबत असलं आणि प्रत्येक जण आरामदायक स्थितीत असल्याचं दिसत असला तरीही बायो बबलमध्ये राहणं खूप कठीण आहे. त्यामुळे यावेळी मी माझ्या स्वत:साठी वेळ घेतला आहे", असं हार्दिक पांड्याने स्पष्ट केलं.
"क्रिकेटचा दौरा असला की तुम्ही तुमच्या कुटुंबापासून बराच वेळ दूर असता. त्याचा प्रत्येकालाच त्रास होत असतो. म्हणूनच मला माझ्यासाठी वेळ हवा होता. जेणेकरून मला माझी वैयक्तिक कामं करण्याची आणि कामगिरी सुधारण्याची संधी मिळेल. मी दररोज दोन सत्रांमध्ये खेळाचाही सराव करतो. पण मुख्य मुद्दा म्हणजे मी नेहमीच शांतपणे काम करतो आणि भविष्यातही मी तसंच करेन", असंही हार्दिक पांड्याने स्पष्ट केलं.