माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याचे कौतुक केले आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दीर्घ काळानंतर टीम इंडियात परतला असून आता तो पूर्णपणे फिट दिसत आहे. यामुळे हार्दिक पांड्या टीम इंडियासाठी गेम चेंजर ठरू शकतो, असं मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं आहे.
“तो एक गेम चेंजर आहे. केवळ विश्वचषक स्पर्धेतच नाही, तर प्रत्येक गेममध्ये हे दिसून येईल. नव्या चेंडूसह मला हार्दिक पांड्याला पाहायचं आहे. तो पहिलं किंवा दुसऱ्या चेंजची बॉलिंगची जबाबदारी सांभाळू शकतो,” असं सुनील गावस्कर हार्दिक पांड्याबद्दल बोलताना म्हणाले. जो अखेरिस येऊन गेम बदलू शकतो, अशा पाचव्या नंबरचा फलंदाज म्हणून तो बिलकूल फिट आहे, असंही ते म्हणाले.
टी २० विश्वचषक स्पर्धेनंतर हार्दिक पांड्याला संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यानं आयपीएल २०२२ मध्ये पुनरागमन केलं आणि पहिल्यांदाच उतरलेल्या गुजरात टायटन्सला कर्णधार म्हणून विजयही मिळवून दिला. त्यानंतर त्याचं टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं. दिल्लीत पार पडलेल्या पहिल्या सामन्यातही त्यानं जबरदस्त फलंदाजी करत १६ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या होत्या. सध्या तो चांगली गोलंदाजीही करत असल्यानं एक अतिरिक्त गोलंदाज म्हणूनही पर्याय खुला आहे.