नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. अलीकडेच भारताच्या ट्वेंटी-२० संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात यजमान न्यूझीलंच्या संघाला १-० ने पराभूत केले. खरं तर हार्दिक पांड्या त्याच्या ऑनफिल्ड आणि ऑफफील्ड स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय सेटअपमध्ये परतल्यापासून त्याचे वेगळेच रंग मैदानावर पाहायला मिळत आहेत. रोहित शर्माच्या अनुपस्थित हार्दिक पांड्याने भारतीय संघाला मालिका जिंकून दिली.
हार्दिक पांड्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाचा हिस्सा नाही. न्यूझीलंड दौऱ्यावरून परतण्यापूर्वी हार्दिक पांड्याने त्याच्या कृतीतून सर्वांची मनं जिंकली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्याने न्यूझीलंडमध्ये भारतीय संघाची बस चालवणाऱ्या ड्रायव्हरला त्याची भारतीय जर्सी भेट दिली आहे.
बस ड्रायव्हरनं जिंकली मनंहार्दिक पांड्याकडून जर्सी घेतल्यानंतर बस ड्रायव्हर आनंदी असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बस ड्रायव्हर म्हणतो की, "हार्दिकने सही करून त्याची जर्सी मला दिली आहे. हीच जर्सी हार्दिक सामना खेळताना घालतो. हार्दिक व्यतिरिक्त इतर खेळाडूंनीही त्यावर स्वाक्षरी केली आहे. ३१ मार्च रोजी या जर्सीचा लिलाव करणार आहे. यातून मिळालेली रक्कम अनाथ मुलांच्या फाउंडेशनला दान करणार आहे."
हार्दिक पांड्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, २९ वर्षीय पांड्या रोहित शर्माच्या जागी टी-२० फॉरमॅटसाठी योग्य पर्याय मानला जात आहे. टी-२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून १० गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे रोहित शर्माच्या हार्दिकला कायमस्वरूपी टी-२० संघाचा कर्णधार बनवावे अशी मागणी जोर धरत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"