नवी दिल्ली : आयपीएलमध्ये मुंबईचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्यासाठी यंदा आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवणे कठीण होणार आहे. टी-२० विश्वचषकाचे आयोजन अमेरिका-वेस्ट इंडीजमध्ये संयुक्तपणे एक जूनपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे या महिनाअखेरीस भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. दुखापतीमुळे दीर्घकाळ संघाबाहेर राहिलेल्या या खेळाडूची आयपीएलमधील कामगिरीही प्रभावी झालेली नाही.
निवडकर्त्यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काही बाबी समोर आल्या आहेत. त्यानुसार अष्टपैलू हार्दिकचा मार्ग कठीण झाला आहे. हार्दिकची कामगिरी निवडकर्ते, कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या अपेक्षेनुसार झाली नाही, असे सांगण्यात येत आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीतही तो आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे.
...तरच मिळेल संधी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आयोजित बैठकीत मुख्य निवडकर्ते अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात दीर्घ चर्चा झाली. हार्दिक पांड्याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, आयपीएलमधील आगामी सामन्यांमध्ये त्याने शानदार कामगिरी केली तरच त्याला विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळेल.
आयपीएलमधील हार्दिकची कामगिरी
आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांत हार्दिक पांड्याने केवळ १३१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वांत मोठी खेळी ३९ धावांची आहे. त्याने ११ चौकार आणि सहा षट्कार लगावले आहेत. गोलंदाजीतील त्याची कामगिरी आणखी खराब आहे. १२ च्या सरासरीने सहा सामन्यांत केवळ ११ षटके गोलंदाजी करून त्याने १३२ धावा दिल्या आहेत आणि विकेट घेतल्या आहेत केवळ तीन. दोन सामन्यांत त्याने गोलंदाजीच केलेली नाही. या महिनाअखेरीस भारतीय संघाची निवड करण्यात येणार असल्यामुळे हार्दिकला कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. अन्यथा भारतीय संघातून डच्चू मिळण्याची टांगती तलवार त्याच्यावर कायम असेल.
Web Title: Hardik pandya gets Dutch from the World Cup 2024, selectors are unhappy, rahul Dravid and Rohit sharma's role is also tough
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.