मुंबई: क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची २ घड्याळं विमानतळावर जप्त करण्यात आली. याबद्दल आता हार्दिक पांड्यानं स्पष्टीकरण दिलं आहे. दुबईत रंगलेली टी-२० विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर हार्दिक संघासह मुंबईला परतला. त्यावेळी त्याची ५ कोटींची दोन घड्याळं कस्टम विभागानं जप्त केल्याचं वृत्त आलं. याबद्दल हार्दिकनं सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे.
कस्टमच्या कारवाईहबद्दल हार्दिकनं थोड्याच वेळापूर्वी ट्विट करून स्पष्टीकरण दिलं. '१५ नोव्हेंबरला सकाळी दुहईहून मुंबईला पोहोचल्यावर दुबईहून आणलेल्या सामानाची कस्टम ड्युटी भरण्यासाठी मी स्वत: विमानतळावर असलेल्या कस्टमच्या काऊंटरवर गेलो होतो. माझ्याबद्दल सोशल मीडियावर चुकीची माहिती दिली जात आहे. दुबईहून आणलेल्या वस्तूंची माहिती मी विमानतळावर हजर असलेल्या कस्टमच्या कर्मचाऱ्यांना दिली,' असं हार्दिकनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
कस्टम विभागानं माझ्याकडे सर्व कागदपत्रं मागितली आहेत. कस्टम ड्यूटी किती आकारायची यासाठी ते मूल्यांकन करत आहेत. मी संपूर्ण ड्युटी भरण्यास तयार आहे. सोशल मीडियावर घड्याळांची किंमत ५ कोटी सांगितले जात आहे. ती चुकीची आहे. घड्याळांची किंमत दीड कोटी आहे, असं हार्दिकनं स्पष्टीकरणात नमूद केलं आहे.