Hardik Pandya Jason Roy: IPL 2022 स्पर्धेला सुरुवात होण्याच्या काही आठवडे अगोदर इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जेसन रॉय याने बायो-बबलमध्ये राहावे लागणार असल्याचे कारण देत माघार घेतली. यामुळे हार्दिक पांड्याच्या गुजराज टायटन्स संघाला मोठा धक्का बसला. मात्र, आता त्या धक्क्यातून संघाला सावरण्यासाठी जेसन रॉयच्या जागी अफगाणिस्तानचा आक्रमक सलामीवीर रहमामुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) याची संघात वर्णी लागली आहे. त्याला संघात दाखल करून घेतल्याचं IPLच्या ट्वीटर अकाऊंटवरून स्पष्ट करण्यात आलं आहे.
दीर्घ कालावधीपर्यंत बायो-बबलमध्ये राहणे कठीण असल्याचे सांगत रॉयने यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली. त्याच्या जागी आता गुजरात संघाने अफगाणिस्तानच्या गुरबाजला आपल्या संघात स्थान दिले आहे. सलामीवीर गुरबाजने अनेक सामन्यांत आपल्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर प्रभावी कामगिरी केली आहे. टी-२० मध्ये १५० हून अधिकचा स्ट्राइक रेट राखलेल्या गुरबाजने आतापर्यंत ६९ टी-२० सामन्यांत ११३ षटकार ठोकले आहेत. पर्यायी खेळाडू म्हणून गुरबाजचा संघात समावेश करून घेण्यासाठी गुजरात संघ बीसीसीआयच्या परवानगीच्या प्रतीक्षेत होतं. मिळालेल्या माहितीनुसार, गुरबाजच्या निवडीसाठी संघाचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खानने सल्ला दिला होता.
गुरबाजमुळे दूर झाली डोकेदुखी
जेसन रॉयने माघार घेतली असताना ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू वेड आयपीएलच्या दुसऱ्या आठवड्यात संघासोबत दाखल होणार आहे. अशा परिस्थितीत संघाकडे यष्टिरक्षक म्हणून वृद्धिमान साहाचा पर्याय आहे. पण त्याचं टी२० रेकॉर्ड फारसं चांगलं नाही. गुरबाजने पाकिस्तान सुपर लीग, लंका प्रीमियर लीग आणि बांगलादेश प्रीमियर लीगमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता संघाची डोकेदुखी कमी झाली आहे.